Nayan Jadhav Emotional Over Siddharth Bodke Performance : मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी कायमच एकमेकांचं, एकमेकांच्या कामाचं कौतुक करीत आले आहेत. एखाद्या चांगल्या कामाची प्रशंसा कलाकार नेहमीच करीत आले आहेत. अशातच सध्या सर्वत्र अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या कामाचं कौतुक होत आहे. सिद्धार्थ बोडकेची मुख्य भूमिका असलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
शेतकरी आत्महत्या हा आशय असलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सिद्धार्थनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. नुकताच या सिनेमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी या प्रीमियर सोहळ्याला हजेरी लावली होती. प्रीमियरमध्ये पाहिलेल्या सिनेमानंतर अनेकांनी सोशल मीडियावर सिद्धार्थच्या कामाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या.
ऋतुजा बागवे, अनुघा अतुल, भाग्यश्री मोटेसह अनेक कलाकार मंडळींनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमामधील सिद्धार्थच्या कामाचं आणि त्यानं साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अभिनेता सिद्धार्थचं काम पाहून भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कोहिनूर मराठी मीडिया या सोशल मीडिया पेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थचा अभिनय पाहून अभिनेता नयन जाधव भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रीमियरच्या सोहळ्यात सिनेमा पाहून झाल्यानंतर त्यानं बाहेर येत सिद्धार्थला कडकडून मिठी मारली आणि यावेळी त्याच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. नयननं सिद्धार्थ फक्त मिठी मारली आणि अपल्याकडे आता कौतुक करण्यासाठी काही शब्दच नसल्याचं त्यानं कृतीतून सांगितलं. त्यानंतर भावूक होत नयन निघून गेला. एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला त्याच्या कामाची दिलेली ही पोचपावती आहे.
सिद्धार्थ बोडकेचा अभिनय पाहून नयन जाधव भावुक झाल्याचा व्हिडीओ
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि या प्रतिक्रियांमधून चाहत्यांनी सिद्धार्थ आणि नयनचंही कौतुक केलं आहे. “सिद्धार्थला मिळालेला हाच खरा पुरस्कार आहे”, “कलाकार असण्याआधी आपण एक माणूस आहोत हीच बाब यातून दिसून आली”, “त्यातूनच दोन्ही कलाकारांचा एकमेकांप्रति आणि त्यांच्या कामाच्या प्रति असलेला आदर दिसून येतो”, “याचमुळे आम्हाला मराठी कलाकार आवडतात” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओमध्ये व्यक्त केल्या आहेत.
