मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने मनोरंजन विश्वात अभिनय आणि कौशल्याच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसादने नाटकापासून अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. धर्मवीर या चित्रपटामुळे प्रसाद खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. नुकतंच प्रसादने मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती केली आहे.

प्रसाद ओकने नुकतंच एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला चित्रपटांच्या प्रेक्षकांबद्दल विचारणा केली आहे. यावेळी त्याने मराठी प्रेक्षकांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधला. त्याबरोबरच त्याने एक विनंतीही केली.
आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी

प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

“नमस्कार रसिक प्रेक्षक, माझ्या मनातील बोलायची संधी मला मिळाली आणि त्या संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याचा मी प्रयत्न करतोय. मला असं वाटतंय की तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली या सर्व भाषांमधील जे प्रेक्षक ते आधी त्यांच्या भाषेतील चित्रपटांवर प्रेम करतात. त्यानंतर इतर भाषेतील चित्रपटांवर प्रेम करतात.

कधीही चेन्नई, हैदराबाद किंवा अशा ठिकाणी त्यांचे तमिळ आणि तेलुगू हे चित्रपट लागले असतील तर प्रेक्षक ते सोडून हिंदी आणि मराठी चित्रपट पाहायला गेले आहेत, असं कधीही घडत नाही. मला असं वाटतं की हे सर्व आपल्याकडे का घडत नाही?

आपल्या एका कुटुंबाचं चित्रपट बघण्याचं महिन्याचं बजेट जर ५०० रुपये असेल तर त्यातील पहिले २०० रुपये किंवा ३०० रुपये मराठी चित्रपट पाहण्यासाठी खर्च करावेत, असा विचार का केला जात नाही?

जर तुम्हाला वाटत असेल की तेवढा सकस मराठी चित्रपट कुठे आहे, तर मला वाटतं की हे चुकीचं आहे. सध्या मराठीतील प्रत्येक उत्तम दिग्दर्शक हा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विविधतेचे भांडार आहे. पण तुमची कमी आहे. तुम्ही आम्हाला जितके प्रोत्साहन द्याल, तेवढे जास्तीत जास्त चांगले चित्रपट आम्ही करु. तुम्ही जर आलात तर निर्माते जगतील, निर्माते जगले तर दिग्दर्शक जगतील आणि दिग्दर्शक जगले तर तुमच्यासमोर विविध कलाकृती आणू शकतील. ते या परभाषिकांकडून आपण शिकायला हवं. आधी मराठी चित्रपटांवर प्रेम करायला हवं. त्यानंतर मग इतर भाषांमधील चित्रपट पाहायला हवे”, असे प्रसाद ओकने म्हटले.

आणखी वाचा : Video : जिनिलीया देशमुख पुन्हा गरोदर? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रसाद ओकने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’मध्ये प्रसादने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.