Prathamesh Parab Wife Shares Video On Trollers : अलीकडे सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे जणू काही एक समीकरणच झालं आहे. सोशल मीडियाच्या या काळात नेटकऱ्यांकडून अनेक चांगल्या गोष्टींचं कौतुक होतं. मात्र, कौतुकापेक्षाही अधिक आता ट्रोलिंग होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे.

कलाकारांबाबत तर हे ट्रोलिंग जरा अधिकच होताना दिसतं. मनोरंजन सृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना ट्रोलिंगला सामोरे जावं लागतं. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्षच करतात; तर काही या ट्रोलर्सना चांगलंच धारेवर धरतात. त्याशिवाय काही कलाकार त्यांच्या खास शैलीत या ट्रोलर्सना उत्तरं देताना दिसतात.

सोशल मीडियावरील या ट्रोलिंगबद्दल अनेक कलाकारांनी विविध प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच आता मराठी अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरने ट्रोलर्सबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ट्रोलिंग गरजेचंच आहे’ अशी कॅप्शन देत क्षितीजाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये क्षितीजा असं म्हणते, “आता सगळ्यात सोपी गोष्ट कुठली आहे, माहीत आहे? ट्रोलिंग करणे. एखाद्यानं कुठलाही फोटो-व्हिडीओ पोस्ट केला की, कमेंट्समध्ये जाऊन हवी तेवढी नकारात्मकता पसरवायची. कारण- कमेंट्स करणं फ्री आहे ना… एखाद्याचा रंग, उंची काम किंवा अगदी कशावरूनही त्याला वाईट आणि नकारात्मक बोलायचं. म्हणजे आपल्याला त्याबद्दल काही माहीत असो वा नसो; पण कमेंट्समध्ये जाऊन इतकी नकारात्मकता पसरवायची की, त्या माणसाची मानसिक स्थिती खराब झाली पाहिजे.”

त्यानंतर ती असं म्हणते, “पण हे सगळं करण्याआधी आपण किती परफेकट आहोत, हे बघणंसुद्धा गरजेचं आहे. आपण आपल्या आयुष्यातली किती ध्येयं पूर्ण केली आहेत, आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे किंवा आपण आपल्या आपल्याकडे किती लक्ष देतो हे महत्त्वाचं आहे.”

त्यानंतर ती ट्रोलिंग आधी स्वत:पासून करा, असंही मत व्यक्त करते. त्याबद्दल क्षितीजा म्हणते, “हे सगळं करताना मला प्रामाणिकपणे वाटतं की, ट्रोलिंग खूप चांगलं आणि गरजेचं आहे; पण याची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी. म्हणजे स्वतःबद्दल वाईट बोला, स्वतःला ट्रोल करा, स्वतःबद्दल नकारात्मकता पसरवा. हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर कराल, तेव्हाच तुम्ही इतरांना ट्रोल करणं बंद कराल आणि इतरांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल थोडं जागरूक व्हाल. तरीसुद्धा कधीतरी वाटलंच इतरांना ट्रोल करावं, तर एकदा फक्त आरशासमोर जाऊन उभं राहा, समोरच तुम्हाला कमेंट्स सेक्शन दिसेल.”

क्षितीजा घोसाळकर व्हिडीओ

दरम्यान, क्षितीजाने शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांच्याच पसंतीस उतरला आहे. त्याबद्दल अनेकांनी या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “अगदी खरं आहे”, “बरोबर बोललीस”, “उत्तम” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त करrत तिला पाठिंबा दिला आहे.