अभिनेता सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. सचिन यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या नावामागची कहाणी सांगितली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
सचिन पिळगावकर यांनी नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सचिन पिळगावकरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याविषयी काही आठवणी ताज्या केल्या. यादरम्यान त्यांनी त्यांचे सचिन हे नाव कसे पडले हे देखील उघड केले.
आणखी वाचा : “तुझं माझं नेटवर्क…” ऋतुजा बागवेच्या बोल्ड फोटोवर ओंकार राऊतची कमेंट, अभिनेत्री म्हणाली “सर्व्हर…”
सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले?
“माझे ‘बालिका वधू’ या चित्रपटासाठी कास्टिंग झाले होते. एक दिवस अचानक दिग्दर्शक शक्ती सामंत सर माझ्याकडे आले. त्यांनी मला तुला शूटींगमधून वेळ कधी आहे असे विचारत आर.डी. बर्मन यांना भेटायला जा, असे सांगितले. त्यावेळी माझ्यावर एक सोलो गाणं शक्ती सरांना हवं होतं. त्यांनी आर. डी. बर्मन यांना त्या गाण्याची निर्मिती करा असे सांगितले होते.
एक दिवस मी वेळ काढत त्यांना भेटायला गेलो. मी तिथे गेलो, तेव्हा त्यांनी मला ये बस, बस असे सांगितले. मी बसलो. पण त्यावेळी त्यांना बघून मी फार घाबरलो होतो. त्यांनी मला विचारले तुझे पूर्ण नाव काय? मी त्याने माझे पूर्ण नाव सांगितले. त्यानंतर त्यांनी तुझा जन्म कुठे झाला असे विचारले. त्यावर माझा जन्म शिवाजी पार्कला झाला असे सांगितले. मग त्यांनी शिवाजी पार्कात फिरायचा का असे विचारल्यावर मी होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर त्यांनी मला शाळेचे नाव विचारले. ते देखील मी त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी आईचे नाव, वडिलांचे नाव अशी सर्व चौकशी केली.
मी या सर्व प्रश्नांची उत्तर देत असताना थोडा घाबरलो होतो. मी बोलताना अडखळत होतो. माझ्यासमोर माझा देव बसला आहे, तो माझ्याशी बोलत आहे, तर मला थोडी तरी भीती वाटणारच ना. त्यांना माझी ती गोष्ट लगेचच लक्षात आली. ते म्हणाले, सचिन तू मला अजिबात घाबरु नकोस, माझी भीती वाटण्याचे काहीही कारण नाही.
कारण कसं ना, मी तुला कधीही शिव्या घालू शकत नाही. तसेच मी तुला कधी ओरडूही शकत नाही. कारण तुझे नाव हे माझ्या वडिलांचे नाव आहे. मी हे ऐकून हसू लागलो. कारण माझ्या वडिलांनी माझे नाव हे आर. डी. बर्मन यांच्या वडिलांच्या नावावरुन ठेवले होते. ते सचिन देव बर्मन यांचे खूप मोठे चाहते होते”, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
आणखी वाचा : “कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर हे गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. ‘महागुरु’ या नावाने त्यांना विशेष ओळखले जाते.