Shubhankar Tawde & Sunil Tawde New Home : आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या वर्षी मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे.
‘फ्रेशर्स’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या शुभंकर तावडेने आपल्या बहिणीच्या साथीने नवीन घर खरेदी केलं आहे. शुभंकर व त्याची बहीण अंकिता या दोघांनी हे आलिशान घर आई-वडिलांसाठी घेतलं आहे. शुभंकर हा मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे.
‘फ्रेशर्स’, ‘कागर’, ‘कन्नी’ यांसारख्या नवनवीन प्रोजेक्ट्समधून शुभंकरने कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. आज ‘फादर्स डे’निमित्त आई-बाबांसाठी नवीन घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी शुभंकरने चाहत्यांना दिली आहे.
शुभंकरची बहीण पोस्ट शेअर करत लिहिते, “आमचं तावडे निवास… एका नव्या अध्यायाची सुरुवात! शुभू आणि मी तुम्हा सर्वांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर करण्यास उत्सुक आहोत… आम्ही आमच्या आई-बाबांसाठी एक छानसं घर खरेदी केलं आहे. या नवीन घरामुळे आमच्या घराचा पत्ता नक्कीच बदलेल. पण, खरंतर आई-बाबांनी एवढी वर्षे आमच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे या घराच्या रुपात आमच्याकडून आई-बाबांना ही छोटीशी भेट. प्रेम आणि आशीर्वादांनी परिपूर्ण असलेलं आमचं हक्काचं हे तावडे निवास…”
“आमच्या या नव्या घरात असंख्य सुंदर आठवणी निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. विथ लव्ह…अंकिता शुभंकर प्रवीण” असं अभिनेत्याच्या बहिणीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
शुभंकर व त्याच्या बहिणीने आई-बाबांना दिलेलं हे सुंदर गिफ्ट पाहून सगळेच आनंदी झाले आहेत. मराठी कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेकांनी शुभंकर व अंकिताचा प्रचंड अभिमान वाटतोय असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
याशिवाय, सौरभ चौघुले, अमृता खानविलकर, विवेक सांगळे, सोहम बांदेकर, अभिज्ञा भावे, हर्षदा खानविलकर, पूर्वा शिंदे, अभिजीत खांडकेकर, नेहा पेंडसे, किशोरी अंबिये, गौरी नलावडे अशा मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी शुभंकर व त्याच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.