scorecardresearch

“मी टीकेचा धनी…” सिद्धार्थ जाधवने केले सिनेसृष्टीतील ट्रोलिंगवर भाष्य

“आता रणवीर सिंगशी होत असलेली तुलना मी सकारात्मकरित्या घेतो.”

“मी टीकेचा धनी…” सिद्धार्थ जाधवने केले सिनेसृष्टीतील ट्रोलिंगवर भाष्य
सिद्धार्थ जाधव

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधवचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता सिद्धार्थ जाधवचा बालभारती हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या तो व्यस्त आहे. नुकतंच एका मुलाखतीत सिद्धार्थ जाधवने ट्रोलिंगवर भाष्य केले.

सिद्धार्थ जाधव हा लवकरच ‘बालभारती’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात मुलांच्या कलागुणांना वाव देताना भाषेच्या अडचणीमुळे ते मागे न पडता ते पुढे जायला हवेत यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर, नंदिता धुरी हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केले आहे. नुकतंच सिद्धार्थ जाधवने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सिनेसृष्टीत होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

यावेळी तो म्हणाला, मी मनोरंजनसृष्टीत आल्यापासून ‘टीकेचा धनी’ आहे. मला कामाचं कौतुक होत असेल तर चांगलं वाटतं. पण जर कोणी टीका करत असेल तर मी त्याचा जास्त विचार करत नाही. आता मी निवेदन करतो याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. मुळात त्याला निवेदन म्हणावं का? हा माझा प्रश्न आहे. कारण मी त्या मंचावर मोकळेपणाने व्यक्त होत असतो. मग त्याला निवेदन म्हणा, अभिनय किंवा संभाषण म्हणा. जे पुरस्कार सोहळे टीव्हीवर बघायचो त्याचं आज मी निवेदन करतोय, याचा आनंद काही औरच आहे.

आणखी वाचा : “गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो…” सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली

“मला कधी-कधी भरत जाधव म्हटलं जातं, त्याचा आनंद आहे. कारण ज्या नावाशी तुलना होतेय त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. त्याबरोबर मराठीतला रणवीर सिंगही म्हटलं जातं. हे सगळं स्टाइल बदलली म्हणून बोललं जातं. पण मी काही स्टाइल बदललेली नाही. फक्त स्टाइलद्वारे मी स्वत:ला अधिक वेगळ्या पद्धतीनं सादर करु लागलोय एवढंच! माझी ऊर्जा आणि उत्साह तोच आहे. ‘तुला जे आवडेल ते घाल’, असं मी स्वत:ला कायम सांगतो. कदाचित, १४ वर्षांनंतर मला स्टायलिंगची गणितं कळली आहेत. आता रणवीर सिंगशी होत असलेली तुलना मी सकारात्मकरित्या घेतो”, असेही त्याने म्हटले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:03 IST

संबंधित बातम्या