गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नाहीत, प्रेक्षकही नाहीत असे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. इंडस्ट्रीतील निर्माते, मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकार सध्या आपला रिजनल सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रसिद्ध अभिनेते भरज जाधव यांनी साधारण दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अशाच एका मराठी चित्रपटाला पाठिंबा दिला होता. मात्र, आजवर याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केलेली नाही.

भरत जाधव यांच्याबद्दलचा हा खास अनुभव अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट शेअर करत सांगितला आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ते अधिपतीच्या बाबांची म्हणजेच चारुहासची भूमिका साकारत आहेत. स्वप्नील राजशेखर भरज जाधव यांच्याबरोबर एका सिनेमाच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी गेले होते. हा सिनेमा थिएटर्समध्ये चांगला चालला नाही. त्यामुळे मेकर्सनी अनोखी उपाययोजना करत हा सिनेमा गावोगावी, शाळा, कॉलेजांमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानचा प्रसंग स्वप्नील राजशेअर यांनी सांगितला आहे.

स्वप्नील राजशेखर यांची भरत जाधव यांच्यासाठी पोस्ट

मुद्दा असतो एका सकारात्मक कृतीचा…
ती महत्वाची असते…
आणि निरपेक्ष भावनेतून केलेली कृती तर अनन्यसाधारण मोठी ठरते आजच्या जगात…

‘तेंडल्या’ नावाचा भन्नाट सिनेमा सचिन जाधव आणि चमुने अत्यंत अनेक वर्षांच्या कष्टाने बनवला… शेत गहाण ठेवून, गहाणवट शेतीत राबून, त्यातला पैसा सिनेमात लावून…

तो सिनेमा गेल्या १० वर्षांत मराठीमध्ये बनलेल्या सर्वोत्तम पाचात येईल इतका भारी झाला… पण थिएटरमध्ये त्याचं काही घडलं नाही…

नेहमीची सगळी कारणं…
वितरण न होणे, थिएटर्स न मिळणे, प्रेक्षकांची अनास्था इत्यादी…

खचून न जाता तेंडल्याच्या मेकर्सनी “तेंडल्या तुमच्या दारी” चळवळ सुरु केली… गावोगावी शाळा, कॉलेजं सोसायटी इ. मध्ये जाऊन सिनेमा दाखवायचा.

या उपक्रमाची सुरुवात करताना जो प्रदर्शन कार्यक्रम झाला त्यासाठी आपला सुपरस्टार भरत जाधव आणि मी गेलो. चांगल्या सिनेमाला एक पाठिंबा म्हणून.

भरतला सिनेमा अत्यंत आवडला. मेकर्सची जिद्द भावली.. स्वयंप्रेरणेनं त्यानं या उपक्रमाला एक रक्कम प्रदान केली..
त्याची वाच्यता कुठेही न करण्याचा अटीवर…

रक्कम त्या मेकर्सना आधार देणारी… त्यापेक्षा भरत जाधवसारखा अभिनेता आपल्या पाठीशी उभा रहातोय ही भावना प्रचंड बळ देणारी..

त्याच्या या Gesture ने सगळेच भारावले… मला व्यक्तिशः वाटलं की, ही गोष्ट अनेकांना प्रेरक ठरेल…
सध्याच्या नकारात्मक वातावरणामध्ये अशा सकारात्मक गोष्टींचा दिलासा मिळतो…
कुणीतरी अत्यंत निरपेक्ष भावनेने कुणासाठी, विशेषतः नव्या कलावंतासाठी काही करु पाहतंय हे किती आनंददायी आहे.

भरतला वारंवार विनंती करुनही तो याची जाहीर वाच्यता न करण्याच्या अटीवर ठाम होता…
शेवटी मी हट्टाने त्याच्याकडून परवानगी न घेता ही गोष्ट लिहितोय.. ती सांगणं महत्वाचं आहे म्हणून…

भरतसारखे अनेक मराठी कलावंत ढिंढोरा न पिटता सर्वतोपरी समाजकार्यासाठी हातभार लावत असतात, हे मी जवळून पाहिलंय… आपली ही बाजू कळू देण्याची त्यांची वृत्ती नसते. पण हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं…
गरजेचं आहे…

मराठी कलांवत पैशाने असतील, त्याहून मनाने श्रीमंत आहेत हे समजायला हवं आपल्याच मायबाप प्रेक्षकांना…

भरत love you…

View this post on Instagram

A post shared by Swapnil Raajshekhar (@swapnil.rajshekhar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मोठ्या मनाचा माणूस…भरत दादा”, “किती सुंदर उपक्रम”, “भरत जाधव बेस्टच आहेत.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.