Dashavatar Movie : मराठी सिनेसृष्टीत सध्या सर्वत्र ‘दशावतार’ सिनेमाची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी ‘दशावतार’ आवर्जून पाहावा असं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत बॉलीवूडच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमांना धोबीपछाड केलं आहे. मराठी प्रेक्षक सध्या मोठ्या संख्येने ‘दशावतार’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. यासह ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेचं सुद्धा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी ‘दशावतार’ सिनेमाबद्दल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘शिवा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेता तेजस महाजनने सुद्धा नुकताच ‘दशावतार’ पाहिला. चित्रपट पाहिल्यावर व्हिडीओ शेअर करत तेजसने ‘दशावतार’ आणि यामधील सगळ्याच कलाकारांचं भरभरून कौतुक केलं. मात्र, एका गोष्टीची खंत या व्हिडीओद्वारे अभिनेत्याने व्यक्त केली आहे.
आजही अनेकांना ‘दशावतार’ सिनेमा प्रदर्शित झालाय हे माहिती नाहीये. आणखी लोकांपर्यंत आपली ही सुंदर कलाकृती पोहोचली पाहिजे. बॉलीवूड-साऊथ चित्रपटांप्रमाणे सर्वत्र आपल्या मराठी सिनेमाची चर्चा देखील झाली पाहिजे असं मत तेजसने या पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे.
अभिनेता तेजस महाजन ‘दशावतार’बद्दल काय म्हणाला?
आज पहिल्यांदाच अशाप्रकारे Reel व्हिडीओ करून मी माझं मत मांडतोय. दोन-तीन दिवसांपूर्वी मी एक सुंदर चित्रपट पाहून आलो ज्याचं नाव आहे ‘दशावतार’. सिनेमा पाहिल्यावर एकच प्रतिक्रिया होती ‘वॉव जस्ट वॉव’. दिलीप सर तुम्ही ग्रेट आहात, हॅट्स ऑफ आणि ‘दशावतार’च्या संपूर्ण टीमचंही विशेष कौतुक करतो.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी बातम्या वाचत होतो ज्यात ‘दशावतार’च्या कलेक्शनचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मी माझ्या मित्रमंडळींना सुद्धा सिनेमा नक्की पाहा असं सांगत होतो. अशाच एका जवळच्या व्यक्तीला मी बोललो की हा सिनेमा बघायला जा. त्यावर तो समोरून म्हणाला…’काय आहे हे नक्की? हा सिनेमा कुठे लागलाय?’ मग, मी त्याला सांगितलं…अरे म्हटलं नवीन सिनेमा प्रदर्शित झालाय…नक्की बघून ये. त्याने लगेच दुसऱ्या मित्रांना सांगितलं. अर्थात त्यांना सुद्धा ‘दशावतार’बद्दल काहीच माहिती नव्हतं.
खेदजनक! खूप-खूप वाईट वाटतं. कारण, एखादा दक्षिणेतील सिनेमा येतो, एखादा बॉलीवूड किंवा हॉलीवूड सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा सर्वत्र चर्चा सुरू असते. सगळ्यांच्या मनात असतं अरे हा सिनेमा पाहुयात, तो सिनेमा पाहुयात…पण, जेव्हा मराठी सिनेसृष्टीत इतका सुंदर आणि बेंचमार्क सेट करू शकेल असा सिनेमा येतो, अशी सुंदर कलाकृती प्रदर्शित होते आणि लोकांना माहीत सुद्धा नाहीये. पाहणं दूर राहिलं…त्यांना माहिती सुद्धा नाहीये हे ऐकून वाईट वाटतं. त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील लोकांना मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, प्लीज या दोन मिनिटांच्या चौकटीतून ( रील्स व्हिडीओ ) बाहेर पडा आणि १५२ मिनिटांची कलाकृती सिनेमागृहात जाऊन पाहा. महत्त्वाचं म्हणजे ८१ वर्षांच्या तरुण माणसाला स्क्रीनवर धुमाकूळ घालताना पाहा. अर्थात माझ्या अमराठी मित्रमंडळींना सुद्धा मी हाच सल्ला देईन. नक्की ही ‘दशावतार’ची जादू अनुभवा. प्लीज नक्की हा सिनेमा बघा.
दरम्यान, तेजसने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी सुद्धा त्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. ‘दशावतार’बद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी असून, सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे.