Marathi Actor Vaibhav Mangale : बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील कंपूशाही हा कायमच वादातीत मुद्दा राहिला आहे. अनेक जण याबद्दल उघडपणे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतात, तर काही जण याबद्दल अडून अडून बोलताना दिसतात. मराठीतील कंपूशाहीबद्दल कलाकार नेहमीच व्यक्त होत असतात. अशातच आता या कंपूशाहीबद्दल अभिनेते वैभव मांगले यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
अमोल परचुरेंच्या कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत वैभव मांगले म्हणाले, “कंपूशाही म्हणतात… तर ते मला पटत नाही. २०-२५ लोक ओळखीतले असतील आणि एखाद्या भूमिकेसाठी काम करणारा नट दिग्दर्शकाच्या कम्फर्ट झोनमधला, त्या दिग्दर्शकाचं सगळं ऐकणारा आहे, तर तो त्यालाच घेणार. शेवटी दिग्दर्शक हा ‘कॅप्टन ऑफ द शिप’ असतो, त्यामुळे दिग्दर्शक त्याचं ऐकणारे आणि त्याचे नियम पाळणारेच नट घेणार ना…”
यानंतर वैभव मांगले म्हणतात, “कलाकार जर दिग्दर्शकाला प्रत्येक बाबतीत प्रश्न विचारायला लागला तर असे नट कोणत्याच दिग्दर्शकाला आवडणार नाहीत. त्याऐवजी नटाने दिग्दर्शकाला ‘आता मी हे करतो, पण यामागचं लॉजिक मला मिळालं तर बरं होईल’ असं म्हटलं तर ठीक आहे. पण, जर सतत असे लॉजिक विचारायला गेलं तर, दिग्दर्शकाचा अहंकार आणि त्याचं काम त्यामुळे वाढू शकतं.”
यापुढे वैभव मांगले म्हणतात, “मला वाटतं की, नटाला कुठे आणि काय लॉजिक विचारायचं हे कळलं पाहिजे. दिग्दर्शक म्हणून मला माहीत आहे की, हा नट बरा नाही आणि तरीसुद्धा मी त्याला एखादी भूमिका देतो, तर हा त्या सिनेमा किंवा नाटकावर अन्याय असतो. एखाद्या नाटकातील भूमिकांकडून काही मागणी असते, त्यामुळे दिग्दर्शकाचं कर्तव्य आहे की, त्या भूमिकेला न्याय देणारा नट त्या नाटकात घेणं, जेणेकरून ते लोकांना आवडेल आणि ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल.”
यानंतर ते म्हणतात, “आपल्याकडे एखाद्यावर खुन्नस म्हणून भलत्याच नटाला काम दिलं जातं किंवा मी एखाद्या नटाला काम दिलं, मला नटांची गरज नाही, मी कुणालाही नट बनवू शकतो यापद्धतीने काम होतं. यामुळे तुम्ही कोणत्या कलाकारावर अन्याय न करता, त्या कलाकृतीवर अन्याय करत असता. ती कलाकृती चालेल की नाही हे आपल्या हातात नाही. पण, १०-१५ वर्षांनी लोकांनी ती कलाकृती पहिल्यानंतर लोक काय म्हणतील? याचा तरी विचार करायला हवा.”
वैभव मांगले इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर वैभव मांगले म्हणतात की, “पात्रता असणं-नसणं हा वेगळा मुद्दा आहे. दिग्दर्शक म्हणून कळलं पाहिजे की, त्या नटाची क्षमता नसतानाही मी केवळ लोकांमध्ये सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्याला एखादी भूमिका देतो. यात त्या कलाकाराची काहीच चूक नसते असं माझं स्पष्ट मत आहे. मी तर म्हणतो, कंपूशाहीने काम देणं हा गुन्हा आहे.”
यापुढे त्यांनी म्हटलं, “आज मराठी सिनेमांबद्दल जी ओरड होत आहे, त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, अनेक चांगले आणि भूमिकांना न्याय देणारे कलाकार तुमच्या मनासारखे वागत नाहीत, ते कधीतरी काही बोलल्याचं तुम्ही मनात ठेवता, म्हणून तुम्ही त्यांना काम देत नसाल. तर तुम्ही त्या कलाकारावर नाही तर स्वत:च्या कलाकृतीवर अन्याय करता. यात प्रेक्षकांचा काय दोष आहे? एखाद्याचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून त्याला घ्या… असं म्हटलं जातं. अरे का? ते काय गावातलं पारावरचं नाटक आहे का? ती काय लग्नाची सीडी आहे का? घरात बघणार आहात का? ते प्रेक्षक बघणार आहेत आणि त्याचे पैसे मिळणार आहेत; तर ती गांभीर्यानेच करण्याची गोष्ट आहे.”