राजधानी दिल्लीच्या सीमांवर मोठ्या संख्येने शेतकरी पुन्हा एकदा एकत्र जमले आहेत. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर एकत्र आले आहेत. या शेतकऱ्यांवर पोलिसांनी ड्रोनमधून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यासंदर्भातील व्हिडीओ पाहून मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असते. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना दिलेल्या वागणुकीचा अश्विनीने निषेध केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट शेअर केल्या आहेत. ‘निषेध.. भारत कृषीप्रधान देश आहे बरं का…’, अशी पोस्ट अश्विनीने केली आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये “जय जवान व जय किसान हे शाळेत शिकवतात…आता समजते नुसते जय म्हणून होत नाही,” असं अश्विनीने लिहिलं आहे.

दरम्यान, आंदोलक शेतकरी सिंघू, टिकरी, गाझीपूर, नोएडा या सीमांवर येऊन धडकल्यामुळे इथे नाकाबंदी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर दिल्लीत येणाऱ्या मार्गांवर काँक्रीट ब्लॉक, काटेरी तारा लावून रस्ते बंद केले जात आहेत. शेतकऱ्यांवर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. दिल्लीच्या सीमांवरील हे व्हिडीओ पाहून अश्विनी महांगडेने नाराजी व्यक्त केली आहे.