लोकप्रिय मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तीन वर्षांपूर्वी थाटामाटात साखरपुडा केला होता. पण गेल्यावर्षी तिने सोशल मीडियावर पोस्ट करून नातं तुटल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. भाग्यश्री मोटे आता पहिल्यांदाच तिच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल व्यक्त झाली आहे. तसेच काही लोकांना वाटत होतं की तिचं लग्न झालंय, असंही तिने म्हटलं आहे.
“बऱ्याच लोकांचा हाच समज होता की माझं लग्न झालंय, कारण ते सेलिब्रेशन खूपच ग्रँड होतं. पूजा होती. कदाचित त्या साडीमुळे, त्या लूकमुळे लोकांचा गैरसमज झाला. पण नाही. फक्त साखरपुडा झाला होता, जो मोडला,” असं जयंती वाघधरेला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री मोटेने सांगितलं.
लग्नाबद्दल भाग्यश्री म्हणाली, “मी लग्नाचा विचार करणार आहे. माझा प्रेमावर विश्वास आहेच. आणि मला मुलं हवी आहेत. मला मुलं आवडतात. मला माझ्या बहिणीची मुलं इतकी आवडतात. पण मला आधी तसा योग्य जोडीदार हवाय. त्यानंतर मी विचार करेन.”
“तुम्हाला रोज त्या व्यक्तीची निवड करावी लागते. तुम्ही गिव्ह अप करू शकत नाही. पण आता मला तो विश्वास डळमळल्यासारखा वाटतो. काही घटना तसेच ज्या पद्धतीने गोष्टी झाल्या, घडल्या. नशिबाचाही भाग आहे. मी कुणाला दोष देत नाही. कधी कुणाला दोष देण्याचा माझा स्वभाव नाही,” असं भाग्यश्री म्हणाली.
भाग्यश्री मोटेचा साखरपुडा व ब्रेकअप
भाग्यश्री मोटे हिने १० ऑक्टोबर २०२२ रोजी लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट विजय पालांडेबरोबर साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला अभिनेता हृतिक रोशनने हजेरी लावली होती. साखरपुडा करण्याआधी काही वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. साखरपुड्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ती व विजय वेगळे झाले. भाग्यश्रीने एप्रिल २०२४ मध्ये यासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती.
“मी सर्वांना सांगू इच्छिते की बराच काळ एकमेकांबरोबर राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि विजयने चांगल्या कारणांसाठी वेगळं व्हायचं ठरवलं आहे. पण आम्ही चांगले मित्र राहू. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. धन्यवाद,” असं भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिलं होतं. विजय व भाग्यश्री यांनी अचानक साखरपुडा मोडल्याची पोस्ट केल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. आता भाग्यश्रीने योग्य जोडीदाराच्या शोधात असल्याचं वक्तव्य केलं आहे.