Marathi Actress Hemal Ingle Buy New Car : गेल्या काही महिन्यांमध्ये गौरव मोरे, जान्हवी किल्लेकर, यशोमन आपटे अशा अनेक मराठी कलाकारांनी आलिशान गाड्या खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. आता नवीन गाडी घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. या अभिनेत्रीने तिच्या आलिशान गाडीची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या सहज सुंदर अभिनयाने अल्पावधीतच हेमलने सर्वांचं मन जिंकून घेतलं. अभिनेत्रीच्या घरी नुकतंच नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे.
हेमलने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत नव्या कारची झलक सर्वांना दाखवली आहे. यावेळी तिचा पती व अन्य कुटुंबीय देखील उपस्थित होते. वैयक्तिक आयुष्यात हेमल यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकली. जवळपास साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल आणि रौनक विवाहबंधनात अडकले. आता अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना नवीन गाडी खरेदी करत आनंदाची बातमी दिली आहे.

हेमल इंगळेने घेतली नवीन गाडी
हेमल व तिच्या पतीने Volkswagen Golf GTI ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. या आलिशान कारची किंमत जवळपास ५३ लाखांच्या घरात आहे. ( एक्स-शोरुम ) अशी माहिती फायनान्सशियल एक्स्प्रेसने दिली आहे. सध्या मराठी कलाविश्वातून हेमलवर या नव्या कारसाठी कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
हेमल इंगळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर २०२४ मध्ये सर्वत्र ब्लॉकबस्टर ठरलेल्या सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय हेमल मार्च २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हार्दिक शुभेच्छा’ या सिनेमात सुद्धा झळकली होती. आता लवकरच ही अभिनेत्री ‘किर्रर्र काटा किर्रर्र’ या नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.