Prajakta Mali: त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार इथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध केला. यासंदर्भात प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“महाशिवरात्रीचा अतिशय पवित्र दिवस आहे, त्यामुळे इथे फक्त धार्मिक कार्यक्रमच व्हायला पाहिजेत. प्राजक्ता माळी शिवस्तुती सादर करणार असेल तर त्याचा विचार केला पाहिजे कारण मी स्वतः या मंदिराची माजी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केला आहे, हे सगळं चुकीचं घडत आहे,” असं मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे म्हणाल्या होत्या.

प्राजक्ता माळी काय म्हणाली?

“यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं, असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की ‘आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर, नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेलेले आहेत. फुलवतींच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्हीदेखील भरतनाट्यम नर्तिका आहात, तर यंदाचे वर्षी तुम्ही शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर कराल का?’ अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज नृत्यदेवता आहेत, आराध्य देवता आहेत. त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता तात्काळ होकार कळवला,” असं प्राजक्ता माळी म्हणाली.

पुढे प्राजक्ता म्हणाली, “मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम पूर्णपणे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते की मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विषारद, अलंकार केलंय नृत्यातून. बीए. एमए केलंय. अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतू-परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये, अशी मी त्यांना विनंती करते.”

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतं, सगळे भक्त असतात आणि त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजांच्या चरणी अर्पण करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव शिवार्पणमस्तू असं आहे. सगळा शिवावर आधारित कार्यक्रम आहे. वेळेअभावी मी दोनच रचना सादर करणार आहे, बाकिच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार सादर करतील. मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे. गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल, तर विश्वस्त आणि पोलीस जो निर्णय घेतली तो सामाजिक भान बाळगत सर्वांनाच बंधनकारक असेल,” असं प्राजक्ता माळी म्हणाली.