Prajakta Mali Visits Yerwada : प्राजक्ता माळी ही मराठीतील आघाडीची व चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. ती तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ही अभिनेत्री आता अभिनयाबरोबरच उद्योजकतेतही आपली छाप पाडत आहे.
सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी अनेकदा चर्चेत येते. नुकतीच तिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आणि तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तिने तिचे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा प्रयत्न केल्याचे या पोस्टमधून सांगितले.
पुण्यातील येरवडा कारागृहातील व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळीने लिहिले की, पुणे – महिला कारागृह (सुधारणा- पुनर्वसन) सदिच्छा भेट..! सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे कोणाचीतरी मनःस्थिती उंचावणे. श्री श्री रविशंकरजी, मीही माझ्या लहानशा क्षमतेत तेच करण्याचा प्रयत्न केला. (एक छोटे ध्यान सत्र घेतले.) गुरुदेव म्हणतात, आपल्याला कधी कधी रुग्णालये, कारागृह, शेती या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे आपल्याला आठवते की आपले आयुष्य किती कृतज्ञतेने भरलेले आहे. अतिशय खरे. संधी दिल्याबद्दल ‘माहेर महिलागृहा’चे आभार.” तिच्या या कृतीमुळे समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आपल्या करिअरची सुरुवात प्राजक्ताने छोट्या पडद्यावरून केली. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली, तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोच्या सूत्रसंचालनाने तिची प्रसिद्धी आणखी वाढवली. ‘पांडू’, ‘डोक्याला शॉट’, ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी’ आणि ‘फुलवंती’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. २०२० मध्ये तिने ‘शिवोहम’ नावाचे प्रोडक्शन हाऊस स्थापन करून निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. याच बॅनरखाली तिने ‘फुलवंती’ चित्रपटाची निर्मिती केली आणि मुख्य भूमिकाही साकारली, ज्यामुळे तिचे कौतुक झाले.
प्राजक्ता माळीचं चाहत्यांनी केलं कौतुक
लोकांनी या व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “छान काम केलं आहे, तुमचा चाहता म्हणून अभिमान आहे… प्रेरणा देत राहा”, “तुम्ही आमच्यापैकी अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात याची अनेक कारणे आहेत.. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक कार्य… तुम्ही सतत प्रेरणा देता, तुम्ही सर्वोत्तम आहात”, “खूप छान” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.