Marathi Actress Share Pandharpur Wari Video : आषाढी एकादशी जवळ आली की, भक्तांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. विठ्ठलाला भेटण्यासाठी अनेक भक्त पायी पायी पंढरपूरच्या दिशेने निघतात. भक्ती अन् भजनांमध्ये दंग होत विठुनामाचा गजर करत करत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. वारीला निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाला पाहण्याची ओढ लागलेली असते. वारीचा हा नेत्रदीपक सोहळा अनुभव अनुभवण्यासाठी दरवर्षी अनेक वारकरी पालखीत सहभागी होत असतात.
सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभाग घेत असतात. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनेही या वारीत सहभाग घेतला, ही अभिनेत्री म्हणजे सायली पाटील. सायली पाटीलने नुकताच वारीत सहभाग घेतला होता आणि या वारीच्या अनुभवाचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सायलीने वारीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सायली वारकऱ्यांसह देहभान हरपून दंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. कपाळी केशरी गंध, हातात टाळ आणि डोक्यावर तुळस घेत तिने ही पायवारी केली. इतकंच नव्हे तर, अभिनेत्रीने वारीतल्या महिला वारकऱ्यांबरोबर फुगडीही खेळली. तसंच तिने या वारीत काही पारंपरिक खेळ खेळल्याचेही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. सायलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सायली पाटील इन्स्टाग्राम व्हिडीओ
सायली दरवर्षी वारीत सहभागी होत वारीचे खास क्षण शेअर करत असते. अशातच तिने यावर्षीचाही अनुभव शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला आहे. सायलीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. सायलीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी “पांडुरंग हरी”, “जय जय राम कृष्ण हरी”, आणि “खूपच छान” अशा कमेंट्स करीत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ चित्रपट चांगलाच गाजला होता, या चित्रपटातील सायलीच्या भावना भाभी या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. यानंतर सायली ‘घर बंदूक बिर्यानी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या वर्षी आलेला तिचा ‘येक नंबर’ हा चित्रपटही चांगलाच गाजला. त्यानंतर आता ती अभिनेता भूषण प्रधानबरोबर लवकरच ‘स्वप्नसुंदरी’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, सायली पाटील सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे बराच मोठा चाहतावर्ग आहे. सायली सोशल मीडियावर तिचे विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स शेअर करीत असते. अशातच तिनं तिच्या वारीचा अनुभव शेअर केला आहे आणि तिने शेअर केलेला हा वारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.