Shweta Mahadik : लाडक्या बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी घरात काय-काय सजावट करायची असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. काहीजण फुलांची सजावट करतात, तर अलीकडच्या काही वर्षांत अनेकजण इकोफ्रेंडली डेकोरेशन करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. एकंदर, बाप्पाच्या सजावटीसाठी प्रत्येकजण मनापासून मेहनत घेत असतो. सध्या एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने बाप्पासाठी साकारलेल्या भव्य देखाव्याचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने स्वत: बाप्पाची मूर्ती घडवली आहे. गणरायाचा मुकूट, हार हे सगळं काही या अभिनेत्रीने घरच्या घरी तयार केलं आहे. तिने साकारलेल्या भव्यदिव्य देखाव्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे श्वेता महाडिक. ती ‘लोकमान्य’ चित्रपट व काही मालिकांमध्ये झळकलेली आहे. श्वेता प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून देखील ओळखली जाते.

श्वेता इन्स्टाग्रामवर तिच्या क्रिएटिव्ह आयडिया शेअर करत असते. सेलिब्रिटींचे महागडे कपडे घरच्या घरी किंवा कमीत कमी खर्चात कसे शिवायचे, पर्स कशा बनवायच्या, कानातले, डिझानयर कपडे या सगळ्या टिप्स अभिनेत्री तिच्या व्हिडीओतून चाहत्यांना देते. तिच्या भन्नाट कल्पनाशक्तीचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं. मात्र, सध्या श्वेताने साकारलेला सुंदर देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

श्वेता गेल्या ६० दिवसांपासून हा देखावा उभा करण्यासाठी मेहनत घेत आहे. तिची यंदाची थीम होती Marine Theme. या समुद्राच्या थीमला साजेसा असा देखावा तिने बाप्पासाठी साकारला आहे. देखाव्याला रिअल लूक देण्यासाठी श्वेताने कासव, निमो मासा, ऑक्टोपस, डॉल्फिन, समुद्री प्रवाळ या सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत. तर, बाप्पाचं मुकूट सुद्धा मरीन थीमला मॅच होईल असं तिने डिझाइन केलं आहे.

श्वेताने केलेली सजावट पाहून सगळेच थक्क झाले आहेत. किशोरी अंबिये, ऋतुजा बागवे, जुई गडकरी, प्रियांका तेंडोलकर, सुकन्या मोने या सगळ्या अभिनेत्रींनी श्वेतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय नेटकरी सुद्धा अभिनेत्रीची क्रिएटिव्हिटी पाहून थक्क झाले आहेत.