Sukhada Khandkekar : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुखदा खांडकेकरला ओळखलं जातं. अभिनयाबरोबर ती उत्तम नृत्यांगना म्हणून देखील ओळखली जाते. सुखदाने काही दिवसांपूर्वीच परदेशात पार पडलेल्या युरोपियन मराठी संमेलनात सुंदर परफॉर्मन्स सादर केला होता.

मात्र, हा परफॉर्मन्स सादर करण्याआधी सुखदाने दिवसरात्र मेहनत घेतली होती. याचं कारण म्हणजे दोन महिन्यांपूर्वी सुखदाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, नाचताना गुडघा ट्विस्ट झाल्याने तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर संपूर्ण बरं होण्यासाठी तिच्याकडे केवळ २ महिने होते. या दोन महिन्यांत अभिनेत्रीने नेमकं काय-काय केलं तिची प्रकृती आता कशी आहे जाणून घेऊयात…

सुखदा सांगते, “कहानी में ट्वि्स्ट… आज दोन महिने झाले! आराम करणं प्रत्येकाला आवडतं पण, असा आराम…नको रे बाबा! नाचताना गुडघा ट्विस्ट झाल्याचं निमित्त झालं आणि २९ एप्रिल २०२५ रोजी ऑपरेशन झाल्यावर मी आराम करायला एका पायावर तयार झाले. खरंतर लिगामेंटचं ऑपरेशन झाल्यावर किमान ३ महिने आराम, फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि उपचार सुरू असताना हळुहळू रिकव्हरी होते. पण, मी आधीच २ महिन्यांनंतरचा कार्यक्रम घेऊन ठेवला होता. तिथेही डान्स सादरीकरण करायचं होतं. थेट युरोपियन मराठी संमेलनात ही संधी मिळणार असल्याने मी आधीच सगळं ठरवलं होतं. त्यामुळे ऑपरेशन झाल्यावर काहीही करून लवकरात लवकर बरं व्हायचं असं मनाशी ठामपणे ठरवलं होतं.”

अभिनेत्री पुढे लिहिते, “घरात बसून वजन वाढू नये यासाठी डाएट, फिजिओथेरपी या गोष्टी सुरू होत्या आणि या सगळ्याबरोबरच मनात बरं व्हायचा निश्चय केला होता. मनाचा निश्चय किती महत्त्वाचा असतो हे यानिमित्ताने मला पुन्हा एकदा लक्षात आलं. One Day At A Time म्हणत छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत मी जिद्दीने माझे प्रयत्न सुरू ठेवले. या संपूर्ण काळात माझी आई, माझा नवरा बेस्टी अभिजीत खांडकेकर, देवेंद्र पेम दादा, दिनेश लाड सर ज्यांनी मला डॉक्टर शोधण्यापासून लवकरात लवकर त्यांची अपॉइटमेंट मिळावी यासाठी मदत केली. माझे डॉ. चिंतन हेगडे, माझी फिजिओथेरपिस्ट, ट्रेनर, माझे मित्र-मैत्रिणी आणि माझा नव्याने मित्र झालेला वॉकर ( सपोर्ट घेऊन चालणे ) या सगळ्यांची खूप मदत झाली.”

“युरोपियन मराठी संमेलन हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ऑर्गनायझर अमोलचे विशेष आभार की, त्याने माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. मला कोरिओग्राफीमध्ये पूर्ण साथ दिली. मला जमतील अशा स्टेप्स करण्यास अतुल कुलकर्णी यांनी सुचवलं. तेथील स्थानिक कलाकारांचे आभार, ज्यांनी मला मोलाची साथ दिली. हे सगळं सविस्तर लिहायचं कारण माझं कौतुक नाहीये. याउलट तुम्हा सगळ्यांपर्यंत असा संदेश पोहोचवायचा आहे की तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग शारिरीक आजार असो किंवा मानसिक… फक्त मनात ठरवलं पाहिजे मग Sky Is The Limit! महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सगळ्या गोष्टी डाएट, योगा हे डॉक्टरांच्या संमतीशिवाय हे करू नका.” असं सुखदाने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुखदाने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी, “लवकर पूर्ण बरी हो” अशा कमेंट्स केल्या आहेत. तर, श्रुती मराठे, सावनी रविंद्र, स्वप्नील राव या कलाकारांनी सुखदाने शस्त्रक्रिया झाल्यावर फक्त दोन महिन्यांत प्रकृतीची काळजी घेऊन परफॉर्मन्स सादर केल्यावर तिचं कौतुक केलं आहे.