रोहन कानवडे दिग्दर्शित ‘साबर बोंडं’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात गे कपलची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.

जेव्हा एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायातील सिनेमे येतात. तेव्हा त्या समुदायातील कलाकारांनी भूमिका साकारली, तर ते जास्त न्याय देऊ शकतील, अशी चर्चा बऱ्याचदा होताना दिसते. आता यावर रोहन कानवडे यांनी त्यांचे मत सांगितले.

“माझ्यासाठी अभिनय सगळ्यात महत्त्वाचा…”

नुकतीच रोहन कानवडे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “मला तसं पूर्णपणे वाटत नाही. चित्रपटात जी पात्रं आहेत, ती कशी दिसावीत हे माझं ठरलं होतं. मला तो लूक पाहिजे होता. त्याबरोबरच माझ्यासाठी अभिनय सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझं मत असं नव्हतं की, एलजीबीटीक्यू समुदायातूनच कलाकार पाहिजेत वगैरे.

“न्याय दिला पाहिजे म्हणजे नेमकं काय? मला ते दाखवायचंच नाही की, गे मुलं म्हणजे वेगळं काहीतरी करायचं आहे. मला नेहमी असं वाटतं की, लैंगिकता हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा खासगी भाग असतो. लैंगिकता ही तुमची ओळख नसते, जसं माझी ओळख ही चित्रपट निर्माता आहे. कोणी स्ट्रेट माणूस जाऊन म्हणतो का मी स्ट्रेट आहे. ती त्यांची ओळख नसते. मला चित्रपटात हे दाखवायचं आहे की दोन मुलं इतर पुरुषांप्रमाणेच तसेच नॉर्मल पुरुष आहेत.

“मला वाटतं की, न्याय अभिनयाला द्यायचा होता; बाकी कशाला नाही. परफॉर्मन्सला न्याय देणारी माणसं पाहिजेत आणि मला ते कलाकार भेटलेत. जगभरात लोकांनी सिनेमा पाहिला, मला कोणी याबद्दल कोणी बोललं नाही. कारण- त्यांनी जे स्क्रीनवर पाहिलंय, त्यांना ते खरं वाटलं आहे.

रोहन कानवडे असेही म्हणाले की, चित्रपटातून आपल्याला जे मिळवायचं आहे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. बाकी गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की, आपण उगाच त्या गोष्टींमध्ये अडकून बसतो. कदाचित चित्रपटाला ज्या काही चांगल्या गोष्टी पाहिजे असतात, त्या होत नाहीत. त्यामुळे मला हा सिनेमा करताना ते सगळं अजिबातच करायचं नव्हतं. मला सांगितलं गेलं होतं; पण मी म्हणालेलो की, मला कलाकार चांगले पाहिजेत; मग ते स्ट्रेट किंवा गे असोत. मला कलाकार चांगले मिळाले, तर मी त्यांना कास्ट करणार आहे. माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे.”