Dashavatar Box Office Collection Day 1: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणारा ‘दशावतार’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘दशावतार’ शुक्रवारी (१२ सप्टेंबरला) प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून ‘दशावतार’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ज्येष्ठ मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील त्यांचे विविध लूक लक्षवेधी ठरत आहेत. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट ‘दशावतार’ सिनेमात दाखवण्यात आली आहे.

दशावतारचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, याची आकडेवारी इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे. ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६५ लाख रुपये कमावले.

कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे दशावतार. कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार होय.

‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज आहे. तसेच विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘दशावतार’ चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबरच सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.