लवकरच एक धमाल मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हास्य, थरार आणि गूढतेने भरलेल्या या सिनेमात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. ‘स्मार्ट सुनबाई’ असं या चित्रपटाचं नाव असून तो २१ नोव्हेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

‘स्मार्ट सुनबाई’ असं हटके नाव असलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पोस्टरवरील काही कलाकार शहरी लुकमध्ये तर काही कलाकार ग्रामीण लुकमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक मराठी कलाकार या सिनेमात झळकणार आहे, त्यामुळे “ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण? आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे?” असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, किशोरी शहाणे, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार, कांचन चौधरी हे लोकप्रिय कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. या कलाकारांची केमिस्ट्रीच या चित्रपटाची खरी जमेची बाजू ठरणार आहे.

smart sunbai
स्मार्ट सुनबाई चित्रपटाचे पोस्टर (सौजन्य – पीआर)

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, विजय नारायण गवंडे, साई – पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे सुरेल स्वर या सिनेमाला लाभले आहेत.

प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा हा नवीन सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित चित्रपट ‘स्मार्ट सुनबाई’ २१ नोव्हेंबरपासून सिनेमागृहांमध्ये पाहता येईल.