Subhedar Movie Release Date : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. याच अष्टकातील पाचवे पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकंतच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सुरुवात आऊसाहेब कोंढाणा किल्ल्याबद्दल बोलताना दिसत आहे. त्यावर पुढच्या एका महिन्यात कोंढाणा तुमच्या चरणाशी आणून नाही ठेवला, तर नाव शिवबा नाही सांगणार, असे बोलताना दिसत आहेत.
आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

यानंतर सुभेदार चित्रपटात तानाजी सुभेदारांनी केलेली तलवारबाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी यांच्यातील मैत्री, कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी केलेली लढाई यांची झलक पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच या चित्रपटात तानाजी सुभेदारांच्या घरी लेकाच्या लग्नाची सुरु असलेली लगबग, त्याचवेळी स्वराज्यावरील संकट आणि बेलभंडारा उचलून, हात उंचावून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ घेऊन गड जिंकण्यासाठी निघालेले सुभेदारही पाहायला मिळत आहेत.

“म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्यात, पर त्या समद्यांसनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजं हवं ना”, असा डोळ्यात अश्रू आणणारा एक डायलॉगही पाहायला मिळत आहे.

‘सुभेदार’ या चित्रपटात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपटात संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.