सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. अजूनही कलाकार या धक्क्यातून सावरलेले नाहीत. आता मराठी मनोरंजन सृष्टीतील एका लोकप्रिय गायिकेने नितीन देसाई यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर करत तिचं दुःख व्यक्त केलं. तसंच या प्रकरणाचा निवाडा व्हावा अशी इच्छाही व्यक्त केली.
गायिका आनंदी जोशी तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. काल नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर एक पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, “दादा, तुम्ही लढवय्ये होतात आणि आहात. खूप संघर्षाने तुम्ही ND स्टुडिओ उभारलात. तुमचं स्वप्न पूर्ण केलंत. आणि आता जेव्हा त्या स्टुडिओच्या अस्तित्वावरच घाला येऊ लागला तेव्हा तो वाचवण्यासाठी शेवटचं मृत्यूचं दानही स्वीकारलंत. तुमच्या या कृतीला दुबळं म्हणण्याचं दुःसाहस कोणी करू नये. जे झालं ते दुर्दैवी मात्र निश्चितच आहे. कलाक्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. माझ्यासारख्या तुम्हाला जेमतेम दोन-पाच वेळा वरवर भेट झालेल्या तुमच्या आणि तुमच्या कामाच्या चाहतीला काल तुमचा अंत्यसंस्काराचा व्हिडीओ पाहून रडू आवरत नव्हतं. Anxiety ने रात्रभर बेचैन होते. तर तुमच्या कुटुंबियांची आणि मित्रपरिवाराची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाही. देव हे सारं पचवण्याचं त्यांना बळ देवो.”
पुढे ती म्हणाली, “अत्यंत प्रतिभावान, ध्येयवेडा कलाकार, अफाट कल्पनाशक्ती असलेला आणि ती अथक परिश्रमाने सत्यात उतरवणारा असा एक महान कलादिग्दर्शक, आपल्या कामाने इतिहास घडवणारा आणि मराठीचा झेंडा जगात फडकवणारा एक मराठी माणूस आणि आईवडिलांबद्दलची कृतज्ञता सतत मनात जपणारा मुलगा, ही आमच्या मनातली तुमची ओळख कधीही पुसली जाणार नाही. तुमची जिद्द कायम प्रेरणा देत राहिल. आणि तुमचा संघर्ष लढण्याचं बळ देत राहिल.”

शेवटी तिने लिहिलं, “तुम्ही मात्र आजही लढता आहात. देहरूपाने आता आमच्यात नसलात तरी ! देवाकडे एकच मागणं आहे. इतका सोन्यासारखा माणूस साऱ्या जगाने गमावला, तेव्हा न्याय हा शब्द अर्थहीन वाटतो. पण तरी निवाडा व्हावा. स्टुडिओच्या रूपाने का होईना पण तुमचं काम, तुमचं अस्तित्व अबाधित रहावं.” आता तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.