काही दिवसांपूर्वी ‘गोदावरी’ आणि ‘सनी’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. ‘सनी’ चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. पण अशातच मल्टिप्लेक्स चालक मात्र या चित्रपटाचे शो रद्द करत असल्याचं कल्याणमधून समोर आलंय. काही प्रेक्षकांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यानंतर सनी चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्वीट करून संताप व्यक्त केला होता. आता याच मुद्द्यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्माचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट केलंय. त्यात त्यांनी चित्रपटगृहचालकांना इशारा दिला आहे. “आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘गोदावरी’ आणि प्रेक्षकांची चांगली गर्दी खेचत असलेला ‘सनी’ या दोन्ही चित्रपटांचे शोज सोमवारी कमी झाले, हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे. लोकप्रिय आणि चांगल्या कलाकृतींना बळ देणं गरजेचं आहे. ‘सनी’ चित्रपटाला किती गर्दी होतेय, हे सोशल मीडियामधील व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसतंय. असं असूनही मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकविण्याची वेळ आली आहे,” असं अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.   

नेमकं काय घडलं?

हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला ‘सनी’ या मराठी चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अशातच काही प्रेक्षकांना मात्र तिकिटाचे पैसे परत करून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने चित्रपटाचा शो कॅन्सल करण्यात आल्याचं त्याने ट्वीट करून सांगितलं. मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत हेमंत ढोमेने लिहिलं होतं की “आपल्या अजून एका प्रेक्षकाबरोबरही तोच प्रकार घडला… तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय… SM5 कल्याणमधला हा प्रकार… प्रेक्षक जात असूनही चित्रपट असा डावलला जाणं चूक की बरोबर?” तसेच आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्याने, “दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत?” असंही म्हटलं आहे.

“तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन…” मराठी चित्रपटाचा शो रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मुद्द्यावरून आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे आणि मराठी चित्रपटांचे शो रद्द करणाऱ्या मल्टिप्लेक्स चालकांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.