Marathi Actor Devendra Gaikwad New Thar Roxx Car : आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत नवीन गाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने नुकतीच नवीन गाडी खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली. आता गौरव पाठोपाठ मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेत्याने आलिशान गाडी घेतली आहे.

‘मुळशी पॅटर्न’ सिनेमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेला दया म्हणजेच अभिनेता देवेंद्र गायकवाडने नुकतीच थार गाडीची खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. गाडी घेतानाचा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र त्याच्या कुटुंबीयांसह गाडी खरेदी करायला गेल्याचं पाहायला मिळतंय. “हे आहे माझं नवीन प्रेम…भेटा थार रॉक्सला ( Thar Roxx )” असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे.

‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’ अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये देवेंद्रने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘चौक’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी देवेंद्रला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. देवेंद्रने काही हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा छाप पाडली आहे.

देवेंद्र गायकवाडने खरेदी केली नवीन गाडी

देवेंद्र गायकवाड सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. त्याने नवीन गाडी खरेदी केल्याची आनंदाची बातमी नुकतीच सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याचे कुटुंबीय नव्या गाडीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्रने खरेदी केलेल्या गाडीचं नाव थार रॉक्स असं आहे. अभिनेत्याची नवीन गाडी पाहून त्याच्या कुटुंबीयांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे. या गाडीची किंमत १२.९९ लाख ते २३.०९ लाखांच्या घरात आहे अशी माहिती फायनान्शियल एक्सप्रेसने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. जयवंत वाडकर, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, रमेश परदेशी या कलाकारांनी देवेंद्रच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.