मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरादार चर्चा चालू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दोन दिवसांतच दमदार ओपनिंग केली होती. त्यामुळे सध्या या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

‘नाच गं घुमा’ चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघींनीही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या दोघींची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. परंतु, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच घट्ट झाला आहे. आज मुक्ता तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने नम्रताने खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जाणार दुबईला! परदेशात करणार LIVE सादरीकरण, जाणून घ्या

“मुक्ता ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझ्यासाठी माझी खूप मोठी प्रेरणा आहेस. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत. आपला सिनेमा सुपरहिट झाला ताई…तुझ्यासारख्या दिग्गज, बलाढ्य अभिनेत्रीसमोर उभं राहण्याची ताकद मला तुझ्यामुळेच मिळाली. कारण, तू खूप आपलंस केलंस मला आधार दिलास. मला एवढं बळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! मी तुझी खूप मोठी फॅन झाले आणि आता तू माझी मैत्रीण सुद्धा झालीस त्यामुळे माझी कॉलर पण टाइट झालीये…लव्ह यू सो मच ताई!” अशी सुंदर पोस्ट नम्रताने मुक्ता बर्वेसाठी लिहिली आहे. या पोस्टबरोबर नम्रताने दोघींचा पैठणी साड्यांच्या ड्रेसमधील सुंदर असा एक फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : वीकेंडसाठी नेटफ्लिक्सवरील सर्वोत्तम ॲक्शन-थ्रिलर चित्रपट अन् वेब सीरिजची यादी; तुम्ही पाहिल्या आहेत का ‘या’ कलाकृती?

नम्रताप्रमाणे मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार आज मुक्ता बर्वेला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. संपूर्ण मनोरंजन विश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्यासह सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय या चित्रपटाला स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील, परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णी असे ६ सर्जनशील निर्माते लाभले आहेत.