Nikki Tamboli: केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २५ एप्रिल २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट उत्तम कमाई करीत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.
‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. आता निक्की तांबोळीने सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी एक खास गोष्ट केली आहे. तिने सूरजच्या चाहत्यांसाठी झापुक झुपूक या सिनेमासाठी थिएटर बुक केले आहे.
निक्की तांबोळी म्हणाली…
‘नवशक्ती’ या चॅनेलने निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये निक्की तांबोळी म्हणते, “काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाण आमच्या घरी आला होता. त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये मी म्हटलं होतं की त्याच्या चाहत्यांना मी त्याच्या चित्रपटांची तिकिटे देईन. त्यानंतर मला बरेच मेसेज आले. मग मी ठरवलं की, सूरजच्या चाहत्यांसाठी थेट शो बुक करते.
निक्की तांबोळी पुढे म्हणाली, “सध्या मी उद्याचे दोन शो आधीच बुक केले आहेत. पुण्यातील मंगला थिएटरचा ७ चा शो आणि सिटी प्राइड कोथरूडला दुपारी ४ चा शो बुक केला आहे. त्यामुळे जे पुण्यात आहेत, त्यांनी नक्की भेट द्या.”
पुढे निक्की तांबोळीने असेही म्हटले की, मला हा सिनेमा खूप आवडला आहे. निक्की तांबोळी व सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाले होते. निक्की तांबोळीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले; तर सूरज या सीझनचा विजेता ठरला. गेल्या काही दिवसांपासून सूरजच्या झापुक झुपूक चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला अभिनेता रितेश देशमुखनेदेखील हजेरी लावली होती. प्रेक्षकदेखील या सिनेमाचे कौतुक करीत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, निक्की तांबोळीबाबत बोलायचे तर ती बिग बॉस मराठी ५ नंतर ‘सेलेब्रिटी मास्टर शेफ इंडिया’ सीझन १ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोमध्ये निक्की दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचली; तर गौरव खन्नाने पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले. आता निक्की तांबोळी लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात दिसणार आहे. या शोचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ करणार आहे. या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय कलाकारदेखील स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात काय धमाल होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.