Nivedita Saraf : आजवर केवळ विनोदीच नव्हे तर विविधांगी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेते म्हणजे अशोक सराफ. गेली अनेक दशके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेदेखील त्यांनी आपल्या अभिनयाने निखळ मनोरंजन केलं आहे.

निवेदिता सराफ यांनी लेकासाठी शेअर केली खास पोस्ट

नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या निवेदिता सराफ सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी मुलगा अनिकेतच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अशोक सराफ आणि अनिकेत सराफ यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर करत निवेदिता यांनी अनिकेतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

निवेदिता सराफ यांच्या लेकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

या पोस्टमध्ये त्यांनी लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असं म्हटलं आहे की, “माझा प्रिय अनिकेत, तू माझ्याबरोबर घडलेली सर्वात चांगली गोष्ट आहेस. आज तू ज्या प्रकारचा व्यक्ती बनला आहेस. त्याबद्दल मला तुझा खूप अभिमान आहे. तुझा संयम, दयाळूपणा, तुझी आंतरिक शक्ती आणि प्रेमाबद्दल मी तुझे खूप कौतुक करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

अनिकेतच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांकडूनही शुभेच्छा

अनिकेतच्या वाढदिवसानिमित्त मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, निवेदिता यांनी शेअर केलेल्या पोस्टखाली स्वप्नील जोशी, अधिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान मंजिरी ओक, शिल्पा तुळसकर, क्षिती जोग, सुकन्या मोने आदी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय निवेदिता व अशोक सराफ यांच्या चाहत्यांकडूनही त्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

अनिकेत सराफच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती

दरम्यान, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत हा शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात फार रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्याला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण हे फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. त्याने युट्युबवर ‘निक सराफ’ या नावाने चॅनल सुरु केले आहे.

निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या कामाबद्दल

तर निवेदिता सराफ या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर अशोक सराफ हे कलर्स वाहिनीवरील ‘अशोक मा. मा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नुकताच त्यांचा अशी ही जमवाजमवी हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात त्यांच्याबरोबर अभिनेत्री वंदना गुप्ते यादेखील मुख्य भूमिकेत आहेत.