लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच लग्नबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर या जोडप्याने मुंबईत भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. लग्नानंतर पूजा व सिद्धेश यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पूजा व सिद्धेशचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. लग्नात दोघांनी मराठमोळा लूक केला होता. पूजाने पिवळ्या रंगाची गुलाबी काठ असलेली नऊवारी नेसली होती. नाकात नथ व सोन्याचे पारंपरिक दागिने घालत तिने हा लूक पूर्ण केला होता, तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

हेही वाचा- पूजा सावंतने बिचवरील ‘या’ फोटोमागची सांगितली गंमत, म्हणाली, “सिद्धेशचा छोटा भाऊ अन्…”

रिसेप्शन सोहळ्यातही दोघांच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. रिसेप्शनमध्ये पूजाने लाल रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसली होती, तर सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती व त्यावर काळ्या रंगाची भरजरी शाल घेतली होती. लग्नाच्या व रिसेप्शनच्या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. मात्र, या सगळ्यात चर्चा रंगली ती पूजाच्या मंगळसूत्राची.

पूजाने पारंपरिक पद्धतीचे मंगळसूत्र परिधान केले. पूजाच्या मंगळसूत्रात दोन वाट्या, काळे मणी व सोन्याचा वापर करण्यात आला आहे. पूजाने परंपरा जपत सासर व माहेरची अशी दोन मंगळसूत्रे घातली आहेत. पूजाच्या पारंपरिक मंगळसूत्राला मॉर्डन टच देण्यात आला आहे. पूजाचे हे मंगळसूत्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा- पूजा-सिद्धेशच्या नव्या संसाराला पुष्कर जोगने दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला, “तुम्ही दोघे…”

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पूजाने सिद्धेशबरोबर गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लग्न ठरल्याची आनंदाची बातमी दिली होती. पूजा व सिद्धेशचं लग्न अरेंज पद्धतीने जमले आहे. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो, तर पूजाचा नुकताच ‘मुसाफिरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.