मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. नुकताच अभिनेत्री पूजा सावंत हिचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून पूजाने आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. सध्या पूजाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

संगीत, मेहंदी, हळद, ग्रहमख आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजा व सिद्धेशचा झाला. २८ फेब्रुवारीला दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नासाठी पूजा व सिद्धेशने खास मराठमोळा लूक केला होता. पूजाने गुलाबी काठ ज्यावर सोनेरी नक्षी काम असलेली पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तसंच यावर त्याने फेटा घातला होता. दोघं खूपच सुंदर दिसत होते. दरम्यान, सिद्धेशबरोबरचं नातं जाहीर करताना पूजाने बीचवरील काही फोटो शेअर केले होते. याच फोटोमागची गंमत तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितली.

हेही वाचा – पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी

पूजाने ‘रेडिओ सिटी मराठी’ या रेडिओ चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी बीचवरील फोटोमागची गोष्ट पूजाने सांगितली. पूजा म्हणाली, “हे फोटोशूट सिद्धेशचा लहान भाऊ आशिष आणि त्याची बायको डायना केलं होतं. त्यांनी काढलेलं हे फोटो होते. सिद्धेशकडे स्वतःचा कॅमेरा आहे. आम्ही फक्त कॅमेरा घेऊन एका बीचवर गेलो होतो आणि मी डायनाला सांगत होते. खालून क्लिक कर हा अँगल चांगला आहे. मी आणि सिद्धेश मग पोज देत होतो. आशिष आणि डायनाने हे फोटो काढले आहेत. प्रोफेशनल फोटोग्राफरकडून काढलेले हे फोटो नाहीत.”

हेही वाचा – लग्नानंतर प्रथमेश परब बायकोबरोबर ‘या’ ठिकाणी गेला फिरायला, फोटो शेअर करत म्हणाला, “दोघांच्याही…”

दरम्यान, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पूजाने बीचवरील फोटो शेअर करत सिद्धेशबरोबर असलेलं नातं जाहीर केलं होतं. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दोघांचा साखरपुडा झाला. यानंतर लग्नाआधीचे विधी सुरू झाले आणि अखेर २८ फेब्रुवारीला दोघं लग्नबंधनात अडकले.