गेल्या काही काळापासून मनोरंजन क्षेत्रात एक नवीन प्रकार उदयास आला आहे, तो म्हणजे सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कलाकाराची भूमिकेसाठी निवड करणे. किंवा सोशल मीडियावर अधिक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तीची एखाद्या भूमिकेसाठी निवड करणे. या प्रकाराबद्दल अनेक कलाकारांनी भाष्य केलं आहे. तसंच सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून एखाद्या भूमिकेसाठी निवड होणे याबद्दल स्पष्ट शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशातच आता यावर मराठी अभिनेत्री प्राजक्ता हनमघरनेही तिची स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. याबद्दल सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता असं म्हणाली, “हल्ली सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं. हे मला विशेषच वाटतं. मला त्याचा त्रास होतो किंवा आनंद होतो; यापेक्षा मला हे खूप गंभीर वाटतं. मग एक मिलियन आणि बिलियनमध्ये असलेले फॉलोअर्स तिकीट काढून चित्रपट बघायला का येत नाहीत? त्याच्या निम्म्या लोकांनी तरी चित्रपट बघितला पाहिजे किंवा तुमचं काम बघितलं पाहिजे ना?”
यानंतर प्राजक्ताने असं म्हटलं, “सगळी माध्यमे वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक माध्यमाची गरजही वेगवेगळी आहे. हे आपल्याकडील लोकांच्या कधी लक्षात येणार माहीत नाही. प्रत्येक माध्यमाचं महत्त्व हे तितकंच आहे. आम्ही ज्या माध्यमात काम करत आहोत, इन्फ्लुएन्सर ज्या माध्यमात काम करतात किंवा निवेदक वगैरे ज्या माध्यमात काम करतात, ही सगळी माध्यमे वेगवेगळी आहेत. त्यामुळे आता माध्यमांची सरमिसळ करणं मला धोकादायक वाटत आहे. पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी हे खूप धोकादायक आहे.”
यानंतर प्राजक्ता म्हणाली, “हा शिकून येणारा व्यवसाय नसला तरी हा खूप गंभीर स्वरूपाचा व्यवसाय आहे. मी आता काहीच करत नाही, तर मी अभिनय करून बघते हे खूप गंभीर आणि धोकादायक आहे. मला याचा राग येतो. मी काही वर्ष काहीतरी केल्यानंतर आता दिसावंसं वाटतं आणि मग मला आता अभिनय करायचा आहे असं म्हणणं खूप विचित्र आहे. दूरदर्शन, नाटक आणि चित्रपट या तीन क्षेत्रांशिवाय अगदी गाण्याच्या व्हिडीओमधून केली जाणारी कामं वेगळी आहेत. त्याच्या तांत्रिक बाजूही वेगळ्या आहेत.”
दरम्यान, प्राजक्ताने आजवर मराठी मालिका आणि कॉमेडी शोजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची जीएसटी’ या कार्यक्रमांमुळे प्राजक्ता घराघरांत पोहोचली आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. सध्या तिची महत्त्वाची भूमिका असलेला ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपटही चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.