Prajakta Mali and Gashmeer Mahajani: प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांचे आवडते कलाकार आहेत. प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

गश्मीर महाजनी सध्या त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे. २०२६ मध्ये त्याचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे वक्तव्य अभिनेत्याने अनेकदा केले आहे.

गश्मीर आणि प्राजक्ता २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट बनवला गेला आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या चित्रपटात गश्मीर आणि प्राजक्ता प्रमुख भूमिकेत दिसले होते. स्नेहल प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्राजक्ता आणि गश्मीरच्या ऑनस्क्रीन जोडीवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. या चित्रपटातील गाणीदेखील विशेष गाजली.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

आता मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर हा सिनेमा हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी नुकतेच इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हा व्हिडीओ गश्मीरने त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे. या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यांनी सांगितले की, ‘फुलवंती’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता सिनेमा कुठे पाहता येणार हे जाणून घेऊ…

गश्मीर व प्राजक्ताने सांगितले की, ‘फुलवंती’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाल्याची माहिती कलाकारांनी दिली.

गश्मीर म्हणाला, “समस्त महाराष्ट्राने फुलवंतीवर जे प्रेम केलं आहे. त्यासाठी सर्वांचे खूप आभार आणि खूप धन्यवाद. ॲमेझॉन प्राइमवर तुम्ही या चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. बातमी ही आहे की हा चित्रपट आता हिंदीमध्ये डब केला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिंदीमध्येसुद्धा जे डबिंग केले आहे ते मी आणि प्राजक्ताने स्वत:च केले आहे. आमच्या आवाजात हे डबिंग केलेले आहे. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

प्राजक्ता पुढे म्हणाली, “हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. तुम्ही आता हा चित्रपट पाहू शकता. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा आणि त्यानंतरसुद्धा नाना पाटेकर, सचिन पिळगांवकर त्यांनी हा सिनेमा हिंदीमध्ये का डबिंग केले नाही, असे विचारले होते. खरंतर थोडा उशीर झाला आहे.

गाणीसुद्धा हिंदीमध्ये डब केलेली आहेत. त्यामुळे आता हिंदी लावणीवरदेखील लोक नाचू शकणार आहेत, असेही प्राजक्ता म्हणाली.

‘फुलवंती’मध्ये गश्मीर व प्राजक्तासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारदेखील दिसले होते. प्रसाद ओक, वैभव मांगले, हृषिकेश जोषी, सविता मालपेकर, स्नेहल तरडे, विभावरी देशपांडे, विजय पटवर्धन, चेतना भट, गौरव मोरे, चिन्मयी सुमित, जयंत वाडकर, समीर चौघुले, अदिती द्रविड, सुखदा खांडकेकर, राया अभ्यंकर, दीप्ती लेले अशा अनेक कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळाल्या.

दरम्यान, अनेकदा चाहते या दोन्ही कलाकारांना ‘फुलवंती’नंतर ते कधी एकत्र दिसणार, असा प्रश्न विचारताना दिसतात. आता चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.