कवी कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते प्रशांत दामले यांनी मोठी घोषणा केली आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे व ज्येष्ठ अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांना ओळखलं जातं. गेली अनेक वर्षे त्यांनी रंगभूमीवर अधिराज्य गाजवलं आहे. ‘जादू तेरी नजर’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. प्रशांत दामले नाट्यसृष्टीत जितके सक्रिय असतात तितकेच सक्रिय ते सोशल मीडियावरदेखील असतात. फेसबुकच्या माध्यमातून ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

हेही वाचा : “अक्षय कुमार अर्ध्या तासात घरी आला अन्…”, विवेक ओबेरॉयने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “बॉलीवूडमध्ये बहिष्कार…”

प्रशांत दामले यांनी मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत ‘तिकिटालय’ या मराठमोळ्या मनोरंजनात्मक व तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ केला आहे. प्रेक्षकांना या ॲपवर आपल्या सोयीनुसार तिकीटं बुक करता येणार आहेत. मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या मनोरंजनात्मक ॲपचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचं संपूर्ण प्रक्षेपण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून करण्यात आलं. या कार्यक्रमाला संकर्षण कऱ्हाडे, महेश कोठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘तिकिटालय’बद्दल प्रशांत दामले म्हणाले, “मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून माझ्या डोक्यात होती. त्यामुळे तिकिटालय या ॲपची संकल्पना मला सुचली. या ॲपवर सगळी माहिती प्रेक्षकांना उपलब्ध होईल. कोणतं नाटक कुठे सुरू आहे? कोणतं नाटक आता बंद झालं याची सगळी माहिती तुम्हाला अगदी सहज मिळेल. मराठी नाट्य निर्मात्यांना देखील हे ॲप खूप सोयीचं आहे. मराठी सिनेमा, नाटक याशिवाय या ॲपवर प्रेक्षकांना फक्त मराठी कलाकृती विषयकच माहिती मिळेल.”

हेही वाचा : हिरवा चुडा, जांभळ्या रंगाचा लेहेंगा अन्…; पूजा सावंतला लागली सिद्धेशच्या नावाची हळद, लेकीसाठी आईची लगबग सुरू…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे सध्या नेटकऱ्यांकडून प्रशांत दामलेंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच जास्तीत जास्त प्रेक्षकांनी येत्या काळात या बुकिंग ॲपचा वापर करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.