Prathamesh Parab Shares Mumbai Local Experience : मुंबईची ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने आजवर अनेकांनीच प्रवास केला असेलच. मुंबईसारख्या सतत धावणाऱ्या शहारात माणसांना एका टोकावरून दुसऱ्या टोकावर घेऊन जाण्याचं काम ही लोकल ट्रेन करते. केवळ सामान्य मुंबईकरच नव्हे; तर अनेक कलाकार मंडळीसुद्धा या लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. असाच लोकल ट्रेनने एका मराठी अभिनेत्याने प्रवास केला होता.

‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’ आणि अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता प्रथमेश परबने नुकताच त्याचा मुंबई लोकलचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. मुंबई लोकलने प्रवास करत असताना त्याने एकेदिवशी विनातिकीट प्रवास केला होता, ज्यामुळे त्याला टीसीने पकडलंसुद्धा होतं. मात्र यानंतर पुढे काय झालं? चला बघू…

बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत प्रथमेशने त्याचा हा किस्सा शेअर करत असं म्हटलं, “‘बालक पालक’नंतर ठाण्याला गेलो होतो. तर तिकडे जायला दादरवरुन दुसरी ट्रेन पकडावी लागते. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते; त्यामुळे म्हटलं की, विनातिकीट प्रवास करून बघू… त्यामुळे मी तिकीट न काढता प्रवास केला; तर दादर स्टेशनवर नेहमीप्रमाणे तिकीट चेक करणारा (टीसी) उभा होता.”

यानंतर प्रथमेश सांगतो, “तेव्हा मला वाटलं मी त्याच्यासमोरून निघून जाईन. नाटकातला असल्यामुळे मला खूप अभिनय येतो असं वाटलं आणि त्यामुळे मी टीसीला समोरूनच गेलो. खरंतर त्याचं दुसरीकडे लक्ष होतं, एकाला त्याने पकडलं होतं आणि तो त्याची तिकीट तपासत होता. तर मला वाटलं मला पकडणार नाही. पण त्याच्या बाजूने जात असतानाच त्याने मला पकडलं.”

यापुढे तो असं म्हणतो, “मी त्याच्यासमोर तिकीट असण्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला. तिकीट नाही हे माहीत असूनही त्याच्यासमोर मी पाकीट वगैरे काढलं आणि त्याला तिकीट पडलं असं उत्तर दिलं. त्यानंतर ते मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेव्हा असं वाटलं की, आता मला हे जेलमध्ये टाकतील. तेव्हा तिकीट काढलं असतं तर बरं झालं असतं असे अनेक विचार मनात आले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते काही केल्या बघतच नव्हते. तेव्हा मी त्यांना ‘बालक पालक’मध्ये अभिनय केला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.”

प्रथमेश परब इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे प्रथमेशने संगितल, “मी त्यांना म्हटलं की “तुम्ही ‘बालक पालक’ सिनेमा पाहिलाय का?” त्यावर ते मला म्हणाले “हो… मग?”, यानंतर मी त्यांना सांगितलं की, “त्या सिनेमात मी विशू होता ना… तो मी आहे.” मग त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि “मला तू तिकीट न काढता प्रवास का करत आहेस” असं सगळं म्हटलं. त्यावर मीसुद्धा त्यांची मनधरणी केली. सॉरी वगैरे म्हटलो…”

यापुढे प्रथमेश असं म्हणाला, “यानंतर त्यांनी ऑफिसमधील सर्वांना बोलावलं, त्या सर्वांसमोर मला फोटो काढायला सांगितलं. तसंच पुढे दादर ते अंधेरी स्टेशनपर्यंत तिकीटही काढायला सांगितलं. त्यानंतर मग मी अंधेरीपर्यंतचं तिकीट काढलं. तेव्हा देवमाणसासारखं त्याने माझ्याकडून कोणतेही पैसे न घेता मला सोडून दिलं. तर हा माझा मुंबई लोकलचा अविसस्मरणीय अनुभव आहे.”