Prathamesh Parab Wife Video On Letest Trend : सध्या जिकडे पाहावं तिकडे गुगल जेमिनीच्या Banana AI Saree चा ट्रेंड सुरु आहे. या ट्रेंडने इंटरनेट, सोशल मीडियासह सर्वत्र अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महिला वर्ग त्यांचे या ट्रेंडमधील साडीतले फोटो शेअर करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा ट्रेंड सगळ्यांकडूनच फॉलो केला जात आहे.
सामान्य नेटकऱ्यांसह अनेक कलाकार मंडळीसुद्धा हा जेमिनीचा Banana AI Saree ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. Banana AI Saree ट्रेंडमधील हटके फोटो काही कलाकारांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. अशातच प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकरने या ट्रेंडशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Banana AI Saree ट्रेंड मधील एक फोटो तिने या व्हिडीओच्या कव्हर फोटोसाठी वापरला आहे. नंतर या व्हिडीओत क्षितीजा असं म्हणते, “कव्हर फोटोवरून तुम्हालाही असं वाटलं असेल की, मी हा ट्रेंड फॉलो केला आहे की काय? पण माझ्या मित्रांनी माझे अनेक छान छान फोटो एडिट करून पाठवले आहेत. त्यामुळे मला तरी हा ट्रेंड प्रचंड आवडला आहे. एखाद्या फोटोशूटसारखे कमाल फोटो या ट्रेंडमधून पाहायला मिळत आहेत. पण या ट्रेंडच्यानिमित्ताने एक किस्सा मी शेअर करणार आहे.”
यापुढे क्षितीजा म्हणाली, “मी ऑफिसवरून घरी येण्यासाठी स्टेशनवर पोहोचले. खूप पाऊस होता. त्यामुळे थोडा वेळ रेल्वे स्टेशनवर बसले होते. तर माझ्या बाजूला दोन कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली बसल्या होत्या आणि त्यांच्यात सध्याचे ट्रेंड, फोटो, व्हिडीओ आणि ते एडिट कसं करायचे? याबद्दल गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात त्यांची ट्रेन आली आणि ती पकडण्यासाठी त्या धावत गेल्या. त्यांच्या हातात एक कुरकऱ्यांचं पाकीट आणि छोटी कोल्ड्रिंक्सची बॉटल होती. दोन्ही संपलेले होतं. तर त्या जिथे बसलेल्या होत्या, तिथेच एक कचराकुंडी होती, जिथे त्या कचरा टाकू शकल्या असत्या. पण त्यांनी ते न करता प्लॅटफॉर्मवरच कचरा टाकून ट्रेन पकडून निघून गेल्या.”
यापुढे क्षितीजा सांगते, “हे सगळं बघून मला असं वाटलं की, आपण सोशल मीडियावरचे कुठलेही ट्रेंड्स फॉलो करतो, तसंच आपण काही नियम पाळले तर? म्हणजे अगदी सोपं की, कुठेही कचरा न फेकणं, वाहतुकीचे नियम पाळणे आणि कुणालाही दिलेली वेळ पाळणे किंवा आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, इतके साधे नियम जरी पाळले तरी खूप आहे. पण नाही… सोशल मीडियावर कुल दिसण्यासाठी आणि आपल्याला ते ट्रेंड्स आधी फॉलो करायचे आहेत.”
क्षितीजा घोसाळकर व्हिडीओ
यानंतर क्षितीजा म्हणते, “विचार करा, आपण सोशल मीडियावरील ट्रेंड्स ज्या वेगाने फॉलो करतो, तेवढ्याच वेगात आपण आपल्या खऱ्या आयुष्यातील सोपे सोपे नियम पाळले तर? आपल्यामुळे देशही कुठच्या कुठे जाईल… पण फरक इतकाच आहे की, सोशल मीडियावर ते व्हायरल नाहीत ना…” दरम्यान, क्षितीजाच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रियांमधून त्यांची संमती दर्शवली आहे. अनेकांनी “अगदी योग्य”, “बरोबर आहे”, “खूपच छान… १०० % खरे आहे तुझं” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.