Praveen Tarde did a new experiment in farm: प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते आहेत. त्यांचा मुळशी पॅटर्न हा चित्रपट विशेष गाजला. गेल्या वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या धर्मवीर २ या चित्रपटाचीदेखील मोठी चर्चा झाली.
अनेकदा प्रवीण तरडे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्याबरोबरच सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात. अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी ते शेअर करत असतात. आता त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रवीण तरडेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी शेतीत एक नवीन प्रयोग केल्याचे सांगितले. या व्हिडीओमध्ये ते शेतात असल्याचे पाहायला मिळत आहे. बांधावर असलेले एका झाड दाखवत अभिनेते म्हणाले, “दोन-तीन वर्षांपूर्वी सफरचंदाची झाडं लावण्याचा एक प्रयोग केला होता. मुळशी तालुक्यात सफरचंदाचं झाड लावण्याचा प्रयोग आजपर्यंत झाला नाही. पण, आम्ही सफरचंदाची काही झाडं आणून आमच्या वेगवेगळ्या शेतात लावली होती. हा आमच्या गावातील खालचा भाग आहे. इथे आम्ही भातशेती करतो.”
“तर इथे काही झाडं लावली होती आणि काही देवराई असते, तिथे लावली होती. त्यातील एक हे झाड व्यवस्थित जगलं आहे, टिकलं आणि आता मोठं झालं आहे. सफरचंद येतील किंवा नाही येणार हा नंतरचा भाग आहे. पण, या बांधावर झाड जगलं. हा प्रयोग यशस्वी झाला, तर येथे काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा आम्ही विचार करत आहोत.”
प्रवीण तरडे असेही म्हणाले की, उन्हाळ्यात झाडं टिकवून ठेवणं, कठीण असतं. माझं येथे येण्याचं प्रमाण कमी असतं. वडीलच सर्व काही करतात. हा व्हिडीओ शेअर करताना प्रवीण तरडेंनी ‘काहीतरी नवीन’, अशी कॅप्शन दिली आहे.
प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेते रमेश परदेशीदेखील दिसत आहेत. त्यांनी ‘मुळशी पॅटर्न’मध्ये पिट्या ही भूमिका साकारली होती.
नेटकरी काय म्हणाले?
आता या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “आता मुळशीत काश्मीर आणता का काय? आरारारा हे लय खतरनाक आहे”, “जबरदस्त”, “एक उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक आणि सुजाण शेतकरी खूप छान दादा”, “एवढा मोठा अभिनेता असूनसुद्धा मातीशी जोडलेला आहे. संस्कार आणि मातीची, गावाची ओढ याला म्हणतात”, “अप्रतिम प्रयोग. कधीच वाटलं नव्हत की, अशा ठिकाणी हे झाड येईल”, “पिट्या भाईला हजेरी किती ठरली आहे”, “आरारारा खतरनाक मुळशीत सफरचंद”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, प्रवीण तरडे आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.