मराठीतील मानाच्या पुरस्कार सोहळ्यांपैकी एक म्हणजे ‘फिल्मफेअर पुरस्कार सोहळा’. नुकताच यंदाचा ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२४’ मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ या दोन मराठीतील आघाडीच्या अभिनेत्याकडे होती. या सोहळ्यासाठी मराठी कलाकारांसह खास हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी व तेजस्वी प्रकाश ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी’ सोहळ्याला उपस्थित राहिले होते.

यंदाचा ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२४’ मध्ये ‘चौक’ चित्रपटासाठी अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांना गौरविण्यात आलं. याचा आनंद व्यक्त करत देवेंद्र यांचे खास मित्र, प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ही पोस्ट पाहून देवेंद्र गायकवाड यांनी भावुक प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Video: “साडी नेसून कॉमेडी करायची काय गरज?” भाऊ कदम आणि ओंकार भोजनेला साडीत पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रवीण तरडेंनी देवेंद्र यांचा फोटो शेअर करत लिहिलं, “चौकातल्या पोराला फिल्मफेअर…आज दयाचे वडील हवे होते. लहान मुलासारखे नाचले असते. पुरुषोत्तम करंडकच्या बक्षिस समारंभापासून प्रत्येक ठिकाणी त्याचं कौतुक करायला यायचे. मला गमतीने म्हणायचे ‘ये तरडे अरे हा नुसतं तुझ्या बरोबर फिरणार का तुझ्यासारखी बक्षिस पण घेणार..?’ बघितलं का काका जे अजून मलाही नाही मिळालं ते बक्षिस आज तुमच्या मुलाने घेऊन दाखवलं. दया तुझा अभिमान आहे आम्हाला…”

प्रवीण तरडेंच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत देवेंद्र गायकवाड म्हणाले, “पदोपदी वडिलांची आठवण येते. पहिली फिल्म केली पहिलं अवॉर्ड मिळालं पण आज बघायला वडील नाहीयेत. दुःख खूप मोठं आहे. पण मला माहितीये हे सगळं त्यांच्याच आशीर्वादामुळे मिळतंय. तुम्ही सगळे असेच आशीर्वाद देत राहा.”

हेही वाचा – आशुतोषच्या अपघाती निधनानंतर सतत रडून अरुंधतीला खऱ्या आयुष्यात झाला होता ‘हा’ आजार, म्हणाली, “माझ्या छातीवर…”

दरम्यान, ‘चौक’ चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा असे अनेक कलाकार मंडळी झळकले होते.