Priya Bapat & Umesh Kamat Lovestory : प्रिया बापट आणि उमेश कामत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सध्या ते त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. प्रिया व उमेश बऱ्याच दिवसांनी एकत्र चित्रपाटातून झळकणार आहेत. अशातच त्यांनी नुकतच त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

प्रिया-उमेश ही जोडी अनेकांची आवडती सेलिब्रिटी जोडी आहे. अनेक जण त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आजवर त्यांनी अनेकदा त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. अशातच त्यांनी नुकतच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना “तुमच्या प्रेमाचा प्रवास सगळ्यांना माहितच आहे पण आता जसं नात्याला तपासून पाहिलं जातं लिव्ह-इनमध्ये राहतात अनेक जण तसं तुम्ही तुमच्या लग्न करण्यापूर्वी वेळ घेतलेला का किंवा तेव्हाचा काळ कसा होता”. असं विचारण्यात आलेलं.

आम्ही कधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार केला नाही – उमेश कामत

विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रिया म्हणाली, “आम्ही प्रेमात पडलो आणि दोन दिवसात लग्न केलं असं काही नाहीये. लग्नीपूर्वी आम्ही ७-८ वर्षं एकत्र होतो. फक्त आम्ही लिव्ह-इनमध्ये राहत नव्हतो.पण आम्ही वेळ घेतला.” पुढे उमेश म्हणाला, “पटकण ठरवलं आणि लग्न केलं असं काही नव्हतं. आम्ही घरी सांगण्यासाठीसुद्धा वेळ घेतला होता. खरंच आम्ही एकमेकांना आवडतोय का की नाही हे जाणून घेण्यासाठीसुद्धा वेळ घेतला. पण त्यावेळी आधी लिव्ह-इनमध्ये राहून बघूयात का, मग लग्न करू हे पर्याय आमच्या डोक्यात कधीच आले नाही.”

उमेशने पुढे सांगितलं की, “तेव्हा आमच्या मनात असेच विचार होते की, लग्न करायचं. उलट आम्ही असं ठरवलेलं की, जर घरच्यांनी परवानगी नाही दिली आपल्या नात्याला. तर एकवेळ बिन लग्नाचं राहू किंवा इतर कुठल्याही व्यक्तीशी लग्न करणार नाही. पण त्यांच्याविरुद्ध पळून जाऊन वगैरे काही करायचं नाही. आई वडिलांना दुखवायचं नाही. हा एवढाच विचार आमच्या मनात होतं.”

उमेशने पुढे सांगितलं की, “असं असलं तरी आम्ही वेळ घेतला. जर त्यावेळी आम्हाला जाणवलं असतं की, आमची मतं, किंवा काही महत्त्वाच्या गोष्टींमध्येच साम्य नाहीये तर कादाचित आम्ही पुढे गेलो नसतो.”