Priya Bapat & Nivedita Saraf : प्रिया बापटने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये प्रिया बेबी बंपवर हात ठेवून पोज देत असल्याचं पाहायला मिळालं होतं. या फोटोमुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या फोटोच्या कमेंट्समध्ये देखील चाहत्यांनी तिला यासंदर्भातील प्रश्न विचारले होते. मात्र, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रियाने हे सिनेमातील फोटो असल्याचं स्पष्ट लिहिलं होतं.

प्रिया बापटने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी एका चाहतीने अभिनेत्रीला पुन्हा एकदा या फोटोवरून, “तू खरंच प्रेग्नंट आहेस की चित्रपटातील सीन आहे?” असा प्रश्न विचारला. हा प्रश्न वाचताच प्रिया बापट आणि निवेदिता सराफ या दोघीही खूप हसल्या. यानंतर “नाही! नाही!” असं उत्तर देत निवेदिता यांनी हा फोटो सिनेमादरम्यानचा आहे हे स्पष्ट केलं.

प्रिया म्हणते, “मला निवेदिता ताईबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे. मी तुम्हाला जशी छान गुडगुडीत गरोदर मुलगी दिसतेय…त्याचं कारण काय आहे? निवेदिता ताई तुम्हीच सांगा”

यावर निवेदिता सराफ म्हणतात, “याचं कारण आता तुम्ही १२ सप्टेंबरला थिएटरमध्ये येऊन बघा. तुम्हाला कळेल की, प्रियाने खूप उत्तम काम केलं आहे. आताही तिचं काम पाहून तुम्हाला ती खरंच प्रेग्नंट आहे असं वाटतंय. त्यामुळे सिनेमा नक्की पाहा.” पुढे प्रिया बापटने, “आमची छान केमेस्ट्री पाहायला १२ सप्टेंबरला नक्की चित्रपट पाहायला या” असं आवाहन चाहत्यांना केलं आहे.

दरम्यान, प्रिया बापट व उमेश कामत हे दोघंही ‘बिन लग्नाची गोष्ट’ या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या सिनेमात प्रिया-उमेशसह निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने असे लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. आदित्य इंगळेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून या सिनेमाचे निर्माते सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन वैद्य हे आहेत.