Priya Marathe’s death : प्रिया मराठेच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. गेल्यावर्षी तिची प्रकृती थोडीफार सुधारली होती. मात्र, त्यानंतर तिचा आजार पुन्हा एकदा बळवला. ती सोशल मीडियापासून देखील दूर गेली. आजारपणामुळे प्रियाने मालिकेतून देखील ब्रेक घेतला होता.
प्रियाच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. तर, प्रार्थना बेहेरे, अभिजीत केळकर, शर्मिला शिंदे, अभिजीत खांडकेकर असे अनेक कलाकार प्रियाला अखेरचा निरोप देण्यासाठी तिच्या मीरारोड येथील घरी पोहोचले होते. ३१ ऑगस्टला पहाटे प्रियाचं निधन झालं. ती अवघ्या ३८ वर्षांची होती.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने हे प्रियाला आपली मुलगी मानायचे. तिच्या निधनानंतर विजू माने यांनी भावनिक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रिया मराठेच्या आठवणीत दिग्दर्शक विजू माने यांची भावुक पोस्ट
A Fairytale Ends…
“मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?” हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्याने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या या पोरीला मी मनापासून ‘लेक’ मानलं होतं. बांदोडकर कॉलेजात एक मॉब प्ले केला होता. ‘अ फेअरी टेल…’ प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली. माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का… तिच्या आयुष्यातले खूप चढउतार पाहिले. शंतनुसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू…बाबा लव्ह यू.
दरम्यान, विजू माने यांच्या पोस्टवर मराठी कलाकारांसह प्रियाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत शोक व्यक्त केला आहे. प्रिया मराठेने तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये ‘तू तिथे मी’, ‘पवित्र रिश्ता’, ‘या सुखांनो या’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं.