बॉलीवूडमध्ये आईची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या रीमा लागू यांनी १८ मे २०१७ रोजी या जगाचा निरोप घेतला. ‘हम साथ साथ है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मैने प्यार किया’, ‘कल हो ना हो’ सारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आदर्श आईची भूमिका साकारली. चित्रपटात साकारत असलेल्या आईप्रमाणे त्या खऱ्या आयुष्यातही अगदी तितक्याच निर्मळ आणि मदतीला धावून येणाऱ्या होत्या. त्या सहकलाकारांवर प्रेम आणि माया करायच्या.

रीमा लागू यांनी शरद पोंक्षे यांना त्यांच्या संघर्ष काळात आर्थिक मदत केली होती. याबद्दल स्वत: शरद पोंक्षेंनी एक जुनी आठवण सांगितली आहे. शरद पोंक्षेंना घर घेण्यासाठी २००० साली रीमा लागू यांनी तब्बल साडे तीन लाख रुपयांची मदत केली होती. ही मदत रीमा लागू यांनी नकळत केली होती. या मदतीबद्दल शरद पोंक्षेंनी राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात सांगितलं आहे. तसंच पोंक्षेंनी रीमा लागू यांच्याबरोबरच्या खास नात्याची आठवणही व्यक्त केली.

या आठवणीबद्दल शरद पोंक्षे म्हणाले, “मी रीमा ताईंबरोबर नाटक करत होते. रीमा ताईंचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. एकदिवशी मी ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाच्या तालमीनंतर असा उदास बसलो होतो. तर त्या मागून आल्या आणि “काय झालं?” असं विचारलं. त्यावर मी त्यांना “काही नाही… रोज हा भायंदरवरुन प्रवास करून थकलो आहे. मला या सगळ्याचा कंटाळा आला आहे” असं म्हटलं. तर त्यावर ती म्हणाली, “भायंदरपेक्षा थोडं पुढे ये ना?”.

यापुढे शरद पोंक्षेंनी सांगितलं, “मग मी म्हटलं, “कसं येऊ रीमाताई. माझ्याकडे भायंदर सोडून घर घेण्यासाठी पैसे नाहीत गं…म्हाडाचं घर घ्यायचं म्हटलं तरी मला तीन-साडेतीन लाख रुपये लागतील.” असं मी तिला सहजच बोललो. त्यावर तिनेसुद्धा मग जवळ घेत “होईल रे! काळजी करू नको” असं म्हटलं. दहा-बारा दिवसांनी तिने फोन करून मला घरी जेवायला बोलावलं. म्हणाली “छान गप्पा वगैरे मारू”. मीसुद्धा तेव्हा फार व्यग्र नसायचो, म्हणून गेलो.”

यापुढे शरद पोंक्षे म्हणाले, “तिच्या घरी गेलो तर तिची मुलगी मृण्मयी आणि राजन ताम्हाणे होते; काही वेळाने ते घराच्या कामानिमित्त बाहेर पडले. सगळे गेल्यानंतर रीमाताई मला म्हणाली, “अरे हे सगळे जायचीच मी वाट बघत होते. कारण तुला पैसे द्यायचे आहेत. मला हे घरच्यांना कळू द्यायचं नाही. मी एक जाहिरात केली. त्याचा चेक मिळाला आहे. त्यावर मी नाव टाकलेलं नाही. तर हा चेक तुला देते.”

यापुढे शरद पोंक्षेंनी सांगितलं, “रीमाताई म्हणाली, “भायंदरवरुन आता बोरीवलीमध्ये ये आणि तू म्हणत होतास ते म्हाडाचं घर घे. जमेल तसं मला हे पैसे दे. मी तुला एका सीएचा नंबर देते. महिन्याला चार-पाच हजार जमतील तसे आणि तुला परवडतील तसे हे पैसे परत कर. काही घाई नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे शरद पोंक्षे म्हणाले, “मग मी ते सगळे पैसे तीन वर्षांत दिवस-रात्र काम करून फेडले. त्या पैशांचा शेवटचा चेक मी रीमाताईंना दिला होता. तिला काळ्या साड्या खूप आवडायचा. तेव्हा शिवाजी मंदिरला नाटक संपल्यानंतर मी तिला भेटलो आणि तिला घेतलेली काळी साडी आणि तो शेवटचा चेक दिला.”