Renuka Shahane Share Laxmikant Berde’s Memory : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयानं केवळ मराठीच नाही, तर हिंदी इंडस्ट्रीही गाजवली आहे. दर्जेदार अभिनय आणि हिट सिनेमांनी त्यांनी दोन्ही इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. मराठीतून हिंदीत गेलेल्याही अनेक मराठी अभिनेत्रींबरोबर त्यांनी ब्लॉकबस्टर सिनेमे केले. अशा काही अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे.

रेणुका शहाणे यांच्याबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी सिनेमात स्क्रिन शेअर केली. त्यानंतर आता अनेक वर्षांनी रेणुका शहाणे या लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डेबरोबर एकत्र काम करणार आहेत. रेणुका शहाणे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डे यांचा आगामी ‘उत्तर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने रेणुका शहाणे मुलाखती देत आहेत.

अशातच सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणेंनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम केल्याची जुनी आठवण शेअर केली. तसंच अभिनयच्या निमित्ताने बेर्डेंच्या तिसऱ्या पिढीबरोबर काम केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबद्दल त्या म्हणाल्या, “आगामी ‘उत्तर’ या सिनेमात अभिनय माझ्याबरोबर काम करतोय, हे कळलं तो क्षण माझ्यासाठी भावनिक होता. त्याच्याबरोबर काम करताना मला हे जाणवलं की, एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.”

सिनेमाची सुरूवात लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर झाली

यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची जुनी आठवण सांगत असं म्हटलं, “माझ्या मराठी सिनेमाची सुरूवात ही लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर झाली आहे. एका सिनेमात मी लक्ष्मीकांतची हिरोईन होते. मग ‘हम आपके है कौन’मध्ये मी त्याची वहिनी होते. त्यामुळे आमचं नातं खूपच सुंदर होतं. लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच वागवायचा. इतकंच नाही मी बेर्डेंच्या तिन्ही पिढ्यांबरोबर काम केलं आहे.”

प्रिया-लक्ष्मीकांतबरोबर काम करेन वाटलं नव्हतं

यापुढे रेणुका शहाणे सांगतात, “मी प्रिया बेर्डेच्या आई लता अरुण यांच्याबरोबरही काम केलं आहे. त्या स्वभावाने खूपच गोड होत्या. तेव्हा मला माहीत नव्हतं की, मी पुढे जाऊन त्यांची मुलगी प्रिया आणि लक्ष्मीकांत यांच्याबरोबर काम करेन. आम्ही भेटलो तेव्हा अभिनय मला म्हणाला की, ‘मी तुझ्याबरोबर काम करणारी बेर्डेंची दुसरी पिढी आहे’. त्यावर मी त्याला म्हणाले की, ‘नाही… मी तुझ्यानिमित्ताने बेर्डेंच्या तिसऱ्या पिढीबरोबर काम करत आहे’. अभिनय बेर्डेबरोबर काम करणं हा अनुभव खूपच छान होता.”

दरम्यान, रेणुका शहाणेंचा आगामी मराठी सिनेमा ‘उत्तर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी त्या महेश मांजरेकर यांच्याबरोबर ‘देवमाणूस’ या मराठी सिनेमात दिसल्या होत्या. रेणुका शहाणे सतत अभिनयाच्या विविध क्षेत्रात काम करत असतात आणि त्यांच्या कामाची चाहत्यांकडून नेहमीच प्रशंसा होते.