आपल्या मनमोहक हास्याने सर्वांना भुरळ घालणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रेणुका शहाणेंना ओळखलं जातं. ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमाचं नाव जरी घेतलं तरी त्यांची आणि माधुरी दीक्षितची जोडी डोळ्यासमोर उभी राहते. मराठीसह हिंदी कलाविश्व गाजवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात २००१ मध्ये अभिनेते आशुतोष राणांशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावं शौर्यमन राणा व सत्येंद्र राणा अशी आहेत.

नुकत्याच ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या, “माझी वेगळी काही स्वप्न नव्हतीच. लहानपणापासून मला मुलं हवीच होती. लोक मला जेव्हा माझं उद्दिष्ट विचारायचे तेव्हा मी सांगायचे मला मुलं हवी आहेत. खरंच हीच माझी मनापासून इच्छा होती. कारण, कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्या गोष्टी करिअरमध्ये आपोआप घडत गेल्या. जे-जे काम आलं ते मी करत गेले. पण, मातृत्वाबद्दल माझ्या डोक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. जर मला राणाजी भेटले नसते तर मी मुलं दत्तक घेतली असती.”

रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या, “मी ३६ वर्षांची होते तेव्हा मला पहिलं बाळ झालं. मी माझ्या मुलांच्या सगळ्या गोष्टी करण्यात इतकी गुंतले की इतर काही करण्यासाठी माझ्याकडे एनर्जीच उरायची नाही. माझी दोन्ही मुलं रोज शाळेत जाताना मला त्रास द्यायची. शाळेची कितीतरी वर्ष मी नुसती मोजत होते…की ही वर्ष आता कधी संपतील. पण, आता ते दिवस पुन्हा अनभवू शकत नाही. माझा धाकटा मुलगा मला सोडायचाच नाही. सतत माझ्या कमरेवर असायचा आणि मी त्याला घेऊन फिरायचे. नंतर अचानक एक दिवस त्याची ती सवय सुटली आणि मग मला चुकल्यासारखं वाटलं. या सगळ्या मातृत्वाच्या प्रक्रिया आपल्याला अनुभवल्यावरच कळतात.”

“आज माझी ८५ वर्षांची आई माझी चिंता करते, तिला माझी काळजी वाटते. आजही मी माहेरी गेल्यावर माझी आई मला काहीच काम करू देत नाही. उद्या माझ्याही मुलांसाठी मला हे सगळं करावंच लागणार एकंदर हे सुरूच राहणार आणि मी माझ्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी आनंदाने करणार” अशा भावना रेणुका शहाणेंनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, रेणुका शहाणेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच त्या ‘उत्तर’ या मराठी सिनेमात झळकणार आहेत. त्यांच्यासह यामध्ये अभिनय बेर्डे, हृता दुर्गुळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.