Rinku Rajguru on Akash Thosar: अभिनेत्री रिंकू राजगुरू ही तिच्या पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत सातत्याने चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. रिंकूने आतापर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
२०१६ साली प्रदर्शित झालेला सैराट या चित्रपटातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकार मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
आर्ची आणि परशा या भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘सैराट’नंतर या दोन्ही कलाकारांनी विविध चित्रपटांत काम करून, त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
रिंकू राजगुरू काय म्हणाली?
आता अभिनेत्रीने नुकतीच सकाळ प्रिमिअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सैराट चित्रपटात परशाची भूमिका साकारलेल्या आकाश ठोसरबाबत वक्तव्य केले आहे. आकाश ठोसरबरोबर कसे बॉण्डिंग आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर रिंकू म्हणाली, “आमची मैत्री खूपच चांगली आहे. म्हणजे तेव्हापासून आमच्यात मैत्री आहे.”
“आम्हाला काहीही वाटलं तरी आम्ही फोनवर बोलतो. जसं की मी त्याला फोन करून म्हणाले की मला बोअर होतंय, तू मुंबईला येशील का? मग आपण अमुक असा शो बघायला जाऊ. किंवा मी पुण्याला गेले की एखाद्या कॅफेमध्ये बसून अमुक असा चित्रपट पाहिला का? पुस्तक वाचलंस का? मला अमुक या व्यक्तीचं काम खूप आवडलं. तसेच आम्ही एकमेकांना विविध मुलाखतीदेखील सुचवत असतो. आम्ही सतत बोलत असतो. त्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. मित्र म्हणून आमच्यात पारदर्शकता आहे.”
इंडस्ट्रीमध्ये आणखी कोणाबरोबर जवळीक झालेली आहे? यावर रिंकू म्हणाली, “सगळ्याच लोकांनी खूप छान प्रेम दिलं आहे. मी सगळ्यात लहान आहे, त्यामुळे ज्या सेटवर जाईल, तिथे मीच लहान असायचे, त्यामुळे खूप शिकायला मिळालं. खूप प्रेमाने वागवलं गेलं.”
“मी आताच पुन्हा एकदा साडे माडे तीन या चित्रपटात काम केलं. त्या चित्रपटात भरत सरसुद्धा आहेत. भरत सर वडिलांसारखे आहेत. ते खूप चांगले सल्ले देतात किंवा कधी काम बघितलं तर कौतुक करतात.”
सिद्धार्थ जाधवबद्दल रिंकू म्हणाली, “सेटवर सिद्धू आणि मला खारी-बिस्किट म्हणायचे. नुकतंच आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधन एकत्र केलं. तर अशी खूप चांगली लोकं भेटतात, जी आपल्याला आपल्या चुकीच्या आणि बरोबर गोष्टीही सांगतात.”
रिंकू राजगुरू नुकतीच बेटर हाफची लव्हस्टोरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात रिंकूबरोबर अभिनेता आकाश ठोसर व अभिनेत्री प्रार्थना बेहेरेदेखील प्रमुख भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील रिंकूची भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचे दिसले.
दरम्यान, रिंकू आता आगामी काळात कोणत्या चित्रपट, वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.