Rinku Rajguru on lose her weight: अभिनेत्री रिंकू राजगुरू ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच तिला महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
रिंकू काही दिवसांपूर्वीच बेटर हाफची लव्हस्टोरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता मात्र नुकतीच ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. रिंकूने ‘लोकमत फिल्मी’ला नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने तिचे करिअर, खासगी आयुष्य, चित्रपटातील भूमिका, तिच्याबद्दल उडालेल्या अफवा अशा अनेक विषयांवर वक्तव्य केले आहे.
रिंकू राजगुरू काय म्हणाले?
तसेच, अभिनेत्रीने या मुलाखतीत वजन कमी करण्याबाबतदेखील वक्तव्य केले. रिंकू राजगुरू म्हणाली, ” ‘सैराट’च्या वेळी तर मला बाळसंच होतं, असं मी म्हणते. वाढतं वय असतं. तुम्हाला काही कळत नाही. तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात. चित्रपटासाठी बारीक असायला हवं, असं त्यावेळी काही कळायचं नाही.”
पुढे रिंकू म्हणाली, “आवाक्याबाहेर वजन गेलं. मग सगळे ओरडायला लागले की, कशी दिसत आहेस वगैरे. ते खूप मनाला लागलं. मग एकदा मनाला लागलं की, मी त्यावर काम करते. मी ते मनावर घेतलं आणि मी वजन कमी केलं. नंतर हेही समजायला लागलं की, या इंडस्ट्रीमध्ये राहायचं असेल, तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवावं लागतं. कितीही नाही म्हटलं तरी त्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात.”
प्रसिद्धी मिळाल्यानंतर तू स्वत: काही खरेदी करायला जातेस का? तिथे तू पैसे कमी करा, असं म्हणतेस का? त्यावर रिंकू म्हणाली की कपड्यांची वगैरे मी शौकीन नाहीये आणि त्यामुळे कपड्यांची शॉपिंग करायला जात नाही. पण, भाजी मंडईत गेल्यानंतर मी बार्गेनिंग करते. उदाहरणार्थ- जर काकडी आणि गाजर तुम्ही अमुक इतक्या दरात देत असाल, तर मग कडीपत्ता फ्री द्या, असं मी त्यांना म्हणते.”
दरम्यान, अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना ती दिसते. चाहते तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सोशल मीडियावरील फोटोंनादेखील पसंती देताना दिसतात.