Rinku Rajguru Talks About Sairat : रिंकू राजगुरू मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात प्रसिद्ध झाली. नुकतीच ती ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटातून झळकलेली. अशातच तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘सैराट’बद्दल सांगितलं आहे.

रिंकू राजगुरूने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिला ‘सैराट’बद्दल विचारण्यात आलं होतं. यासह तिला तिच्या करिअरबद्दल तसेच अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त कुठल्या क्षेत्राची निवड केली असती याबद्दलही विचारण्यात आलेलं. ‘सैराट’बद्दल रिंकूनं तिची प्रतिक्रिया देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

रिंकू राजगुरूची प्रतिक्रिया

रिंकूला समजा ‘सैराट’ फ्लॉप झाला असता, तर मग रिंकू राजगुरू आज कुठे असती? खरंच अभिनय क्षेत्राची तिनं निवड केली असती का? या क्षेत्रात तिनं काम सुरू ठेवलं असतं का? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर ती म्हणाली, “नाही माहीत. परिस्थिती आपल्याला काय योग्य आहे, काय नाहीये हे शिकवते त्यामुळे मला माहीत नाही. कदाचित मी मला आवडतंय म्हणून प्रयत्न करीत राहिले असते. कधी कधी चित्रपटत चालत नाही; पण कलाकारांनी चांगलं काम केलेलं असतं. काही वेळा चित्रपट हिट ठरतो; पण कलाकारांनी चांगलं काम केलेलं नसतं.”

रिंकू पुढे म्हणाली, “मी खूप लहान होते तेव्हा मला कलेक्टर व्हायचं होतं. थोडी मोठी झाल्यानंतर डॉक्टर व्हायचं होतं आणि सातवीत असतानाच चित्रपटात काम केलं. डान्स करणं मला शाळेत असल्यापासून आवडायचं; पण ११-१२ वीपर्यंत आपल्याला कळतं की, आयुष्यात पुढे काय करायचं आहे. मला ते कळण्याआधीच सगळं घडून गेलं होतं आणि जे होतं, ते चांगल्यासाठीच होतं, असं माझं मत आहे. त्यामुळे मला नाही माहीत मी काय केलं असतं. आई-वडील शिक्षक आहेत म्हणून शिक्षिकाही झाले असते किंवा डान्सची आवड असल्याने डान्सरही झाले असते; पण नेमकं काय झाले असते हे मला नाही माहीत.”

रिंकूला पुढे ‘सैराट’नंतर काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला का, असं विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “सुदैवानं काम मिळवण्यासाठी मला संघर्ष नाही करावा लागला. माझ्याकडे कामं चालून येत आहेत. संघर्ष फक्त एवढाच करावा लागतोय की, सातत्य ठेवावं लागतं कामात आणि अजून वेगळं काय करू शकतो काय नवीन देऊ शकतो या गोष्टीचाकडे लक्ष द्यावं लागतं आणि हा संघर्ष सगळ्यांनाच करावा लागतो.”

रिंकू राजगुरूला पुढे आकाश ठोसरबरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर ती म्हणाली, “हो आम्ही स्क्रिप्ट बघतोय. जर चांगली लव्हस्टोरी आली, तर नक्की करू.” पुढे ती म्हणाली, “पण ‘सैराट’नंतर मला लव्हस्टोरीसाठी विचारणा झाली नाही”.