Riteish Deshmukh On Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आजपासून ( २९ ऑगस्ट ) उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

राजकीय क्षेत्रासह आता मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात मनोरंजनविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळावा असं मत लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने व्यक्त केलं आहे. अभिनेत्याने एक्स ( आधीचं ट्विटर ) पोस्ट शेअर करत मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश देशमुखची पोस्ट

रितेश म्हणाला, “सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. मनोज जरांगेजी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.”

मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून आंदोलनकर्ते मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागातून शेकडो वाहने मुंबईत येत असल्याने आणि सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असल्याने मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. यामुळेच सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परतावेत अशी आशा रितेशने या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.

दरम्यान, रितेश देशमुख नेहमीच सामाजिक व राजकीय घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमांतून व्यक्त होताना दिसतो. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.