Rohan Kanawade on Nagraj Manjule: नागराज मंजुळे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’सारखे चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले. या चित्रपटांची वर्षानुवर्षे चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळते.

आता ‘साबर बोंडं’ या चित्रपटात नागराज मंजुळे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. आता जरी ते निर्मात्याच्या भूमिकेत असले तरी या चित्रपटाच्या दिग्दर्शनात त्यांची काही मदत झाली का यावर ‘साबर बोंडं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी वक्तव्य केले आहे.

“नागराज सर आता…”

रोहन कानवडे यांनी नुकतीच ‘लोकसत्ता डिजिटल’ला मुलाखत दिली. नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करताना काही मार्गदर्शन केले का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर रोहन कानवडे म्हणाले, “नागराज सर आता ऑनबोर्ड आले आहेत. जेव्हा शूटिंग सुरू होते, त्यावेळी आमचा काही संपर्क झाला नव्हता. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना चित्रपट दाखवला. त्यांनी हा चित्रपट पाहून एक आठवडाच झाला असेल. त्यांना चित्रपट आवडला. ते म्हणाले की, मला चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल.”

पुढे रोहन कानवडे म्हणाले, “जेव्हा मी त्यांना भेटेन, तेव्हा त्यांच्याकडून मला चित्रपटाबद्दलचं मत, त्यांना चित्रपटातलं काय आवडलं हे ऐकायला आवडेल. “

सई ताम्हणकर, विक्रमादित्य मोटवाणी, निखिल अडवाणी हेदेखील कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. त्यांनी चित्रपटाचं कौतुक करत प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावर रोहन कानवडे म्हणाले, “मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे की त्यांच्यासारखे दिग्दर्शक आणि कलाकार या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत; ती महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजकाल स्वतंत्र चित्रपट बनवताना कोणत्या स्टुडिओचा पाठिंबा नसताना तुम्हीच तुमची फिल्म बनवता; तर तशा चित्रपटांना लोकांसमोर येण्यासाठी खूप अडचणी येत असतात.

“पण, जेव्हा यांच्यासारखे दिग्दर्शक किंवा कलाकार पाठिंबा देतात, तेव्हा तो चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग खुले होतात. दिग्दर्शक म्हणून हीच इच्छा असते की आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मला आशा आहे की, त्यांच्यामुळे चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक थिएटरमध्ये येऊन तो चित्रपट पाहतील.”

“या गोष्टीमुळे भविष्यात ज्या दिग्दर्शकांना स्वतंत्र चित्रपट निर्माण करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मार्ग खुले होऊ शकतात. जेव्हा असे मोठे दिग्दर्शक पाठिंबा देतात, तेव्हा त्यातून एकप्रकारे हे सांगितलं जातं की, तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल तर लोक तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आहेत. मी खूप आनंदी आहे की हे सर्वजण आमच्यासाठी ऑनबोर्ड आले आहेत.”

‘साबर बोंडं’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळवणारा हा पहिला मराठी फिक्शन चित्रपट ठरला आहे. आता १९ सप्टेंबर २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.