Sachin Pilgaonkar on Aamhi Satpute movie: अभिनेते सचिन पिळगांवकर हे त्यांचे चित्रपट, त्यांनी साकारलेल्या भूमिका, सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट, तसेच काही मुलाखतींमधील त्यांची वक्तव्ये यांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

सचिन पिळगांवकर यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही, तर निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही मनोरंजनसृ्ष्टीत ना व कमावले. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

त्यांनी साकारेलेल्या काही भूमिकांची आजही चर्चा होताना दिसते. त्यांची प्रमुख भूमिका असलेले काही चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फक्त मराठी सिनेमांत काम केले नाही, तर काही हिंदी चित्रपटांतदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर यांच्याबरोबरचे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘सगळीकडे आम्हीच’, ‘गंमत जंमत’, ‘माँ बेटी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘माझा पती करोडपती’, ‘आम्ही सातपुते’, असे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत. आता सचिन पिळगांवकर यांनी आम्ही सातपुते या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे. सेटवरचे लोक त्यांना कोणत्या नावाने हाक मारत याबद्दल त्यांनी खुलासा केला.

सचिन पिळगांवकर काय म्हणाले?

प्रवाह पिक्चर वाहिनीने सोशल मीडियावर सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर यांचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी विविध चित्रपटांचे काही किस्से सांगितले आहेत. आम्ही सातपुते या चित्रपटाबद्दलही त्यांनी खुलासा केला आहे.

सचिन पिळगांवकर म्हणाले, “सत्ते पे सत्ता हा चित्रपट सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन बनवला होता. मीसुद्धा आम्ही सातपुते हा चित्रपट बनवताना त्या चित्रपटापासून प्रेरणा घेतली होती. सत्ते पे सत्ता हा चित्रपट बघून ‘आम्ही सातपुते’ बनवला नव्हता. कारण- ‘सत्ते पे सत्ता’मध्ये नंतर दुहेरी भूमिका वगैरे इतर गोष्टी आहेत. ‘आम्ही सातपुते’मध्ये असं काहीच नाही.

पुढे सचिन पिळगांवकर म्हणाले, “काही काही टेक्निशियन्स असे होते की, ते मला बाबा म्हणायचे. सुप्रियाने मला विचारले की ते तुम्हाला बाबा का म्हणत आहेत? मग मी तिला सांगितलं की, मी बालकलाकार म्हणून इथे काम केलेलं आहे. त्यावेळी जे लोक इथे काम करत होते, ते मला त्यावेळी बाबा, असे म्हणत असत. ते आताही मला बाबा म्हणतात. मी साडेचार वर्षांचा असल्यापासून कोल्हापुरात काम करतोय. त्यामुळे टेक्निशियन लोकांकरता मी त्यांचा लहान बाबाच आहे.”

तसेच, ‘आम्ही सातपुते’मधील सगळ्यात आवडतं पात्र कोणतं? यावर सचिन पिळगांवकर म्हणाले की, चित्रपटात वहिनी हे जे पात्र आहे, ते माझं आवडतं पात्र आहे. ती घरात आल्यानंतर सगळ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करते. ही खूप कौटुंबिक गोष्ट आहे.”

दरम्यान, सचिन पिळगांवकर हे नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.