Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजेच भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव. २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नोव्हेंबर २०१३ मध्ये निवृत्ती घेतली. आजही घराघरांत सचिनचा चाहतावर्ग आहे. सध्या तो सोशल मीडियच्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असतो. सचिनने नुकतंच रेडिटवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतलं. यावर त्याने सगळ्याच चाहत्यांच्या प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरं दिल्याचं पाहायला मिळत आहे.
सचिन तेंडुलकरला त्याच्या चाहत्याने, “तुम्ही कितीवेळा सिनेमे पाहता आणि त्यापैकी तुमचे आवडते सिनेमे कोणते आहेत?” असा प्रश्न विचारला. यावर मास्टर ब्लास्टरने दोन सिनेमांची नावं सांगितली. यापैकी एक सिनेमा तामिळ भाषेतील आहे तर, दुसरा सिनेमा मराठी आहे.
सचिन तेंडुलकरने पाहिलेल्या आणि त्याला आवडलेल्या पहिल्या सिनेमाचं नाव आहे 3BHK. हा तामिळ सिनेमा जुलै महिन्यात सर्वत्र प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा अरविंद सच्चिदानंदम यांच्या 3BHK Veedu या लघुकथेवर आधारित आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थने प्रमुख भूमिका साकारली आहे.
याशिवाय सचिनला आवडलेल्या दुसऱ्या सिनेमाचं नाव आहे ‘आता थांबायचं नाय’. हा सिनेमा शिवराज वायचळने दिग्दर्शित केला होता. यामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, पर्ण पेठे, आशुतोष गोवारीकर अशा दिग्ग्ज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.
शिवराजने व्यक्त केली कृतज्ञा
सचिनने आपल्या सिनेमाचं कौतुक केल्यावर दिग्दर्शक शिवराज आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने खास पोस्ट शेअर करत मास्टर ब्लास्टरचे आभार मानले आहेत. “सचिन सर खूप खूप आभार…खूप भारी वाटतंय…आता थांबायचं नाय” अशी पोस्ट शेअर करत शिवराजने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शिवराजच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “जीवन सफल झालं…”, “जिंकलंस पोरा”, “मित्रा तू जिंकलास अजून काय हवं”, “जेव्हा क्रिकेटचा देव स्वत: तुमचं कौतुक करतो…कमाल मित्रा”, “वाह शिवराज”, “देवाचा आशीर्वाद मिळाला संपला विषय…” अशा प्रतिक्रिया अभिनेत्याच्या पोस्टवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रेम मिळालं. या सिनेमाने ७.४५ कोटींची कमाई केल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.