Sai Tamhankar Aalech Mi Lavani Video : सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे. सईवर चित्रीत करण्यात आलेली ‘आलेच मी’ ही लावणी प्रदर्शित झाली आहे. धमाकेदार लावणीवर सईच्या नखरेल अदा पाहायला मिळत आहे.

मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे. सईचे हावभाव, तिच्या अदा व नृत्य सगळंच जबरदस्त आहे. गाण्यात पारंपरिक लूकमध्ये सईने सुंदर नृत्य केलं आहे. सई पहिल्यांदाच लावणीवर थिरकली आहे.

सईने सांगितला अनुभव

या भूमिकेसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला, लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणाली, “’देवमाणूस’मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल, अशी आशा आहे!”

पाहा व्हिडीओ –

पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात ‘आलेच मी’ हे गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. या गाण्यात बेलाला रोहन प्रधान यांनी साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी अत्यंत जोशपूर्ण आणि सुरेख आहे.

लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित ‘देवमाणूस’ २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.